सावंतवाडी : देशात सर्वत्र मोदी लाट आल्यानेच त्यांचा परिणाम आम्हाला जाणवला. पण मनसे पुन्हा एकदा उभारी घेईल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष तथा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण हे सिंधुदुर्गमध्येच होणार आहे. आणि या चित्रीकरणात स्थानिक कलाकारांना स्थान देण्यात येईल, असे स्पष्ट केले दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी मनसेच्यावतीने सावंतवाडीत आयोजित केलेल्या नवनिर्माण महोत्सवाला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष धीरज परब, संतोष सावंत, महेश सावंत, गुरू गवडे आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी केदार शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्र आघाडी सरकार तसेच मनसेला निवडणुकीत कमी जास्त मते पडली आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पण यातून आम्ही उभारी घेऊ. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे व्हिजन असून ते बोलल्याप्रमाणे करून दाखवतात. त्यामुळे त्यांच्याकडून सर्वांच्या अपेक्षा आहेत. ३१ मे च्या सभेत ते आपली भूमिका स्पष्ट करतील. चित्रपट दिग्दर्शनाबाबत बोलताना ते म्हणाले, कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात चित्रीकरणासाठी दिग्दर्शक येत असून माझ्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरणही कोकणात विशेषत: सिंधुदुर्गमध्ये करण्यात येणार आहे. दहा ते बारा दिवसांचे हे चित्रीकरण आहे. या चित्रपटात सिंधुदुर्गमधील बहुतांशी युवक व युवतीना स्थान देण्याचा आपला मनोधैर्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सावंतवाडीतील जिमखाना मैदानाला भेट देत नवनिर्माण महोत्सवाची पाहणी केली. महोत्सवाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल माजी आमदार परशुराम उपरकर यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)
मनसे पुन्हा एकदा उभारी घेईल केदार शिंदे
By admin | Published: May 25, 2014 12:37 AM