कुडाळ , दि. १६ : कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी सुमारे २ लाख २३ हजार १५० रूपये किमतीचे २५ ते ३० मोबाईल चोरून नेले. शहरात भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यानजीक असताना मध्यवर्ती ठिकाणी चोरी होतेच कशी, पोलिसांची रात्रगस्त कुचकामी ठरत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.कुडाळ एसटी बसस्थानकासमोरील केळबाई मंदिरकडे जाणाºया मार्गावर जितेंद्र ब्रिजनाथ यादव यांचे लवेश मोबाईल शॉपी हे दुकान आहे. रोजच्याप्रमाणे यादव यांनी शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मोबाईल शॉपी बंद केली. शनिवारी सकाळी शॉपी उघडली असता दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. तसेच दुकानावरील सिलिंग व सिमेंटचा पत्रा तुटलेला होता.
दुकानातील या चित्रामुळे दुकानात चोरी झाल्याचे यादव यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ याबाबतची तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस निरीक्षक अविनाश भोसले तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यानी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
याबाबत माहिती देताना भोसले यांनी सांगितले की, या चोरट्यांनी दुकानाच्या मागच्या बाजूने छपरावर चढून सिमेंट पत्रा व सिलिंग पत्रा फोडून दुकानात प्रवेश केला. या चोरीमध्ये दुकानात ठेवलेले मोबाईल तसेच इतर कंपन्यांचे सुमारे २५ ते ३० मोबाईल मिळून सुमारे २ लाख २३ हजार १५० रूपये किमतीचे मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले. दुकानातील सीलबंद नवीन कंपनीचा सिलिंग फॅनही चोरट्यांनी चोरून नेला. रात्री पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळालेश्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. यावेळी ठसेतज्ज्ञांना तपास करताना एका अज्ञात व्यक्तीच्या हाताचा ठसा मिळाला असून याद्वारे आता तपास करण्यात येणार आहे. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक असतानाही अजूनही बऱ्याच व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नाहीत, असे भोसले यांनी सांगितले. कुडाळ शहराच्या मध्यवर्ती मुख्य बाजारपेठेत झालेल्या या मोठ्या चोरीमुळे चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.