बांदा : डेगवे गावात पुन्हा एकदा माकडतापाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. डेगवे गावात माकडताप संशयित एक रुग्ण आढळला.
सुरुवातीला त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले. परंतु त्यांची तब्येत खालवल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे पाठविण्यात आले. तेथे तपासणी केली असता त्यांना माकडतापाची लागण झाल्याचे समजले. बांबोळी येथे उपचार सुरू असून माकडताप रुग्ण सापडल्याने स्थानिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.जिल्हा आरोग्य यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असे डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई यांनी सांगितले. या महिन्यात डेगवे गावात दोनपेक्षा अधिक मृत माकड सापडले. त्यावेळी ग्रामस्थांनी यांची विल्हेवाट लावली होती.डेगवे गावात गेल्या आठ दिवसांत दोन माकड मृतावस्थेत आढळले. ऐन काजू हंगामाच्या तोंडावर मृत माकडे सापडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन वर्षांपूर्वी बांदा सटमटवाडी येथे माकडतापाने थैमान घातले होते. त्यावेळी काही रुग्ण मृत्युमुखी पडले होते. यामुळेच डेगवे भागातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.यासाठी माकड मृत्युमुखी पडले आहे अशा ठिकाणी पन्नास मीटर परिसरात प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आली. काजू बागेमध्ये जाताना डीएमपी आॅईल पूर्ण शरीराला लावूनच जाणे आवश्यक असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले आहे. अशाप्रकारची काळजी घेणे शेतकऱ्यांना गरजेचे आहे.