सिंधुदुर्ग : मागील पंधरा दिवस दडी मारून बसलेला मान्सून शुक्रवारी (दि.२३) सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाला आहे. त्यामुळे आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार दाखल होणारा मान्सून यावर्षी बिपरजॉय वादळामुळे लांबणीवर पडला होता. मान्सून दाखल होणार म्हणून भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. त्यातच नदी, नाले, ओढे पाण्याअभावी सुकून कोरडे पडले होते. ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई भासत होती. सर्वच भागातील जलस्त्रोत आटल्याने पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत होती. हवामान विभागाने मागील काही दिवसांपासून मान्सूनचे आगमन लांबणीवर पडणार म्हणून इशारा दिल्यानंतर आता काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच जूनचा पहिला पंधरवडा कोरडा गेला. आता शेवटच्या आठवड्यात तरी पाऊस बरसू दे अशी मनोकामना व्यक्त होऊ लागली आहे. शुक्रवारी सकाळी दाखल झालेला मान्सून सक्रीय होणे आवश्यक आहे. हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजानुसार अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.
अखेर सिंधुदुर्गमध्ये मान्सून परतला, शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदी वातावरण
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 23, 2023 3:44 PM