रजनीकांत कदम -- कुडाळ--मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून, ठिकठिकाणी अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गणेश चतुर्थीअगोदर या महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले; मात्र खड्ड्यातील दगड-माती वर येऊन पुन्हा स्थिती ‘जैसे थे’ झाल्याने संबंधित विभागाने खड्डे बुजविण्याच्या कामात बोगसपणा केल्याची चर्चा वाहनचालक व नागरिकांत आहे.कुडाळ तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ही परिस्थिती केवळ कुडाळ तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची आहे. हे खड्डे अपघातास निमंत्रण देत असून, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन मात्र खड्डे कायमस्वरूपी मिटविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत लोकांनी व वाहनचालकांनी गणेश चतुर्थीपूर्वी उठविलेल्या आवाजामुळे प्रशासनाने गणेश चतुर्थीपूर्वी खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र, खड्डे चिऱ्याचे दगड व त्यावर माती टाकून बुजविण्यात आले. त्यामुळे हल्ली दोन-तीन दिवसांत पडलेल्या पावसामुळे व अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे खड्ड्यातील दगड-माती वर येऊन पुन्हा खड्डे तयार झाले.कामात अनियमितपणा : नागरिकांचा आरोपचिऱ्याचे दगड कठीण असले, तरी ते मऊ असतात. असे दगड रस्त्यावरील खड्ड्यात भरल्यानंतर गाड्या, पाणी गेल्याने ते मऊ होतात व खड्डा पुन्हा तयार होतो. महामार्ग विभागाने अशाप्रकारे चिऱ्याच्या दगडांचा तसेच कमी प्रमाणात डांबर, खडी वापरून हे खड्डे बुजविण्याचे बोगस काम केले असल्याचा आरोप नागरिक संबंधित विभागावर करीत आहेत. महामार्गावर केवळ खड्ड्यांमुळे धोका वाढत नाही तर रस्त्याच्या दुतर्फा वाढणारी झाडीझुडपे, तुटायला आलेल्या झाडाच्या फांद्या यापासूनही धोका वाढत आहे. काही ठिकाणी तर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, झाडी रस्त्यावरच आली आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.वळणावळणाच्या, चढ-उतार व अरुंद असलेल्या या राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असतात. सद्य:स्थितीत या महामार्गावरील अपघात क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे व रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी. महामार्गावर एखादा भीषण अपघात झाल्यानंतरच महामार्ग प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल जनता, वाहनचालक व प्रवासी यांच्यातून विचारला जात आहे. गणेश चतुर्थी अगोदर बुजविण्यात आलेले खड्डे चांगल्या पद्धतीने बुजविले असते तर आज या खड्ड्यांपासून सुटका झाली असती. मात्र, एकदाच व्यवस्थित काम न करता ते काम पुन्हा पुन्हा का करावे लागते, याचे कोडे मात्र न सुटणारेच आहे. जिल्ह्यातील प्रमुख आणि महत्त्वाचा मार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग ओळखला जातो. केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर भारतातील मोठ्या प्रमाणात प्रवासी या रस्त्यांवरून ये-जा करीत असतात. त्यामुळे हा महामार्ग सुस्थितीत राखण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.हे करणे आवश्यक आहे...महामार्गावरील खड्ड्यांतील माती पूर्णपणे काढावी व मगच त्यात खडी व जास्त डांबर वापरून खड्डा भरावा. काही झाडांच्या फांद्या सुकलेल्या आहेत. या फांद्यांपासून भविष्यात धोका आहे, अशा झाडांचा सर्व्हे करून ती तोडण्यात यावीत. काही ठिकाणी महामार्गाची साईडपट्टी मोठ्या प्रमाणात खचल्याने धोकादायक बनली आहे. त्यामुळे तिथेही माती टाकावी. दिशादर्शक तसेच अन्य सूचना फलक काही ठिकाणी मोडकळीस आले आहेत. ते बदलावेत. अशा प्रकारच्या काही दुरुस्त्या राष्ट्रीय महामार्गावर केल्यास महामार्ग काही प्रमाणात सुस्थितीत येऊ शकतो. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे येथील महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी जोरदार मागणी प्रवासी व वाहनचालकांतून होत आहे.
महिन्यात महामार्गाची चाळण
By admin | Published: October 11, 2015 8:50 PM