सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी ३०० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी आढळून येतात. हे पक्षी वैभव सिंधुदुर्गच्यापर्यावरण व पर्यटन विकासासाठी फारच महत्त्वाचे आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी बेसुमार वृक्षतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होत आहे, असे मत प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी व्यक्त केले आहे.वन्यजीव सप्ताहानिमित्त वाईल्ड कोकण सावंतवाडी आयोजित आॅनलाईन वेबिनारमध्ये सिंधुदुर्गातील पक्षी विविधता विषयावर डॉ. गणेश मर्गज यांनी मांडणी केली. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला समृद्ध पश्चिम घाट व समुद्रकिनारा लाभला आहे. या समृद्ध वारशामुळे सह्याद्रीच्या कडेकपारी, जंगल, खारफुटी, समुद्र किनारा, नद्या, तलाव, पाणथळ, मिठागरे दलदल, पाणवठे अशा विविध भागांमध्ये ३०० पेक्षा जास्त पक्षी आढळून येतात. या पक्षी वैभवामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यावरणाचेही रक्षण होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष्यांच्या अधिवासात वेगळेपणा जाणवतो. पर्यावरणात पक्ष्यांना फारच महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेसुमार वृक्षतोड व मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची अन्नसाखळी आणि अधिवासातील वैशिष्ट्यपूर्णता पाहता सिंधुदुर्गात जैवविविधता व पर्यावरणाचे रक्षण व्हायला हवे. जैवविविधता समतोल राखण्यासाठी पक्ष्यांचे महत्त्व असल्याची जाणीव मानवाला झाली तर निश्चितच पर्यावरणाचे रक्षण मानव करेल, असेही डॉ. मर्गज म्हणाले.शेती व बागायतीमधील कीटकांनादेखील पक्षी आपले भक्ष्य बनवतात. त्यामुळे शेती बागायतीचे देखील संरक्षण होते. शेतकऱ्यांना पक्ष्यांचे महत्त्व व माहिती करून देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे डॉ. मर्गज म्हणाले. पक्ष्यांचा रामप्रहरी किलबिलाट, सुमधुर आवाज आणि अन्नासाठी धावपळ पाहण्याचा विलक्षण आनंद पक्षी अभ्यासक किंवा पक्षीमित्रांनाच कळू शकतो. त्यामुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होणार नाही यासाठी कायमच प्रयत्न करायला हवा. आज गिधाडे दुर्मीळ झाली आहेत. जिल्ह्यात गिधाडे दिसत नाहीत, असेही ते म्हणाले.पर्यटनासाठी इको टुरिझम गरजेचेपक्ष्यांचे निरीक्षण, अभ्यास करताना त्यांचा दिवसभराचा प्रवास एक विलक्षण सुखद आनंद देणारा ठरतो. पण त्यासाठी समुद्रकिनारे, जंगले, तळी, पाणवठे यांचा ºहास थांबवायला हवा. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरण व पर्यटनाची सांगड घालून पक्षी पर्यटनालादेखील वाव मिळाला तर पक्षीमित्रांची भटकंती पर्यटनाची रेलचेल वाढविणारी ठरणार आहे. त्यासाठी इको टुरिझम गरजेचे आहे, असेही डॉ. गणेश मर्गज म्हणाले.