कृष्णा सावंत --पेरणोली --महाराष्ट्र राज्य निरंतर प्रेरक, सहायक प्रेरक संघटना पुरस्कृत शिक्षण समृद्धी योजना शासनाच्या शिक्षण विभागाच्या लालफितीत अडकल्याने राज्यातील ३५ हजार प्रेरक, सहायक प्रेरक मुंबईच्या आझाद मैदानावर आज, मंगळवारपासून आंदोलन करणार आहेत.राज्यातील प्रेरक, सहायक प्रेरक संघटनेने शासनाकडे सादर केलेल्या शिक्षण समृद्धी योजनेला मागील आघाडी सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. मात्र, युतीच्या काळात सध्या प्रस्ताव लालफितीत धूळ खात असल्याने संघटनेने पुन्हा मुंबई येथील आझाद मैदानावर १६ फेब्रुवारीपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.प्रौढ शिक्षणाचा पुढचा टप्पा म्हणून तत्कालीन केंद्रातील भाजप सरकारने निरंतर शिक्षण केंद्र चालू केले. यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुणांची निवड करून मुख्य प्रेरकाला १४००, प्रेरकाला ७००, सहायक प्रेरकाला ५०० रुपये मानधन दिले. या योजनेचा पाच वर्षे कालावधी संपल्यानंतर तरुणांना बेरोजगारीला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रेरक सहायक प्रेरकांनी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कॉ. संपत देसाई, हुमायून मुरसल, रवी शेंडे, नवनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटना बांधली. संघटनेने प्राथमिक शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी मराठी भाषा, अनौपचारिक शिक्षण बोली भाषांचे संघटित व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी तसेच प्रेरक, सहायक प्रेरकांना योग्य वेतन मिळावे यासाठी शिक्षणसमृद्धी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यासाठी वेळोवेळी व्यापक स्वरूपात चळवळ, आंदोलन केल्याने तत्कालीन शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तत्त्वत: मंजुरी दिली. त्यामुळे केवळ अंमलबजावणी शिल्लक आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही निवेदन देण्यात आले. अद्याप दखल न घेतल्याने संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.मराठी शाळेत सामावून घ्यावेशिक्षण समृद्धी योजनेची अंमलबजावणी करावी व प्रेरक, सहायक प्रेरकांना मराठी शाळेत वेतनावर सामावून घ्यावे, यासाठी आजपासून आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील यांनी सांगितले.
प्रेरकांचे आज मुंबईत आंदोलन
By admin | Published: February 15, 2016 10:13 PM