सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्ती, गवा व माकडांचा उपद्रव वाढला असून त्यांना आरक्षित असलेल्या नैसर्गिक अधिवासात स्थलांतर करण्यासाठी संबंधित यंत्रणेस नियोजनपूर्ण विशेष प्रशिक्षण द्यावे व रानटी प्राण्यांना आरक्षित नैसर्गिक अधिवासात स्थलांतर करावे, अशी मागणी राज्याचे वित्त आणि नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यासह अन्य काही तालुक्यांत रानटी हत्तींनी धुडगूस घातलेला आहे. गेली अनेक वर्षे हत्तींचा उपद्रव सुरूच असून त्यामुळे जीवितहानीबरोबरच माड बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या रानटी हत्तींचा डिगस, हिर्लोक, आरोंदा, माणगाव, कुंदे या भागात वावर आहे. या भागात हत्ती लाखो रूपयांचे नुकसान करीत आहेत. त्याचप्रमाणे गवा, माकड यांचाही उपद्रव वाढला असून या उपद्रवास त्रासून शेतकरी शेती, फळबागायतींपासून परावृत्त होणार की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. शिवाय भीतीपोटी व नुकसानीस कंटाळून शेती करायची सोडून देत आहेत. तर काही शेतकरी व ग्रामस्थ या प्राण्यांना जिवे मारण्यासाठी मागे-पुढे पाहणार नाहीत. तसे प्रकार यापूर्वीही जिल्ह्यात घडलेले असून अनेक हत्ती यापूर्वी मारले गेले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचविण्यासाठी व प्राण्यांच्या जीवितास धोका पोहोचू नये यासाठी संबंधित यंत्रणेस नियोजनपूर्ण प्रशिक्षण देऊन या रानटी प्राण्यांना त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या नैसर्गिक अधिवासात स्थलांतर करावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
हत्ती, गव्यांचे स्थलांतर करावे
By admin | Published: December 24, 2014 9:30 PM