सावंतवाडी : दीपक केसरकर यांचे राजकीय वजन वाढल्याचा त्रास सध्या तालुक्यातील अधिकारीवर्गाला सहन करावा लागत आहे. सावंतवाडीचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्यात महत्त्वाचे मंत्रिपद दीपक केसरकरांकडे असल्याने हा तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनत चालला आहे. अचानक होणारी आंदोलने, मोर्चा तसेच उपोषणे यांची धास्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घेतली असून, तालुक्यातील दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे स्वसंरक्षणार्थ बंदुकीची मागणी केली आहे. मात्र, त्यांचा हा प्रस्ताव सध्या तरी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.सिंधुदुर्ग जिल्हा गेली पंधरा वर्षे राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. यापूर्वी जिल्ह्यातील राजकारणाचे सत्ताकेंद्र हे कणकवली होते. कारण नारायण राणे यांचा मतदारसंघ तसेच मंत्रिमंडळातही वजनदार मंत्री असल्याने नेहमीच विरोधी पक्ष त्यांना मतदारसंघातच घेरण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, २०१४ नंतर सिंधुदुर्गच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा सावंतवाडी झाला आहे. दीपक केसरकर यांना शिवसेनेने मंत्रिमंडळात स्थान दिल्याने ते जिल्ह्याचे पालकमंत्री बनले आहेत. तसेच गृहराज्यमंत्रिपद त्यांच्याजवळ असल्याने नेहमीच ते विरोधी पक्षाच्या रडारवर आहेत. त्यातच अचानक होणारी आंदोलने, मोर्चा, उपोषणे तसेच घेराव यामुळेही या मतदारसंघातील अधिकारी चांगलेच धास्तावल्याचे दिसून येत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मायनिंगपासून ते मच्छिमारीपर्यंत ज्वलंत प्रश्न आहेत. तसेच अधूनमधून वेगवेगळ््या विषयावर घेराव व आंदोलनेही होत असतात. या सर्व कारणांनी अधिकारीही घाबरतात. अनेकवेळा अचानक होणाऱ्या आंदोलनांना पोलिसांपूर्वी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच सामोरे जावे लागत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची सावधानता म्हणून सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार व तहसीलदार सतीश कदम यांनी पोलिसांजवळ स्वसंरक्षणार्थ बंदुकीची मागणी केली आहे.यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भाच्या काही भागात अवैध वाळू उत्खनन होत होते. तसेच चंद्रपूरमधील कोळसा उत्खनन यामुळे काहीवेळा अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रकार वाढले होते. त्याठिकाणी अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षण तसेच स्वसंरक्षणार्थ बंदुकाही देण्यात येतात, पण सावंतवाडीसारख्या ठिकाणी यापूर्वी अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नाही. असे असतानाही सावंतवाडीचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार व तहसीलदार सतीश कदम यांनी स्वसंरक्षणार्थ बंदुकीची मागणी केली आहे.याबाबतचा प्रस्ताव सावंतवाडी पोलिसांना देण्यात आला असून, त्यांनी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. या प्रस्तावावर पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी हे निर्णय घेणार आहेत. तरीही मंत्री केसरकर यांच्या मतदारसंघात अधिकाऱ्यांनी मागितलेल्या पोलिस संरक्षणामुळे अधिकारीवर्गात मात्र खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
आंदोलने-मोर्चांची अधिकाऱ्यांना धास्ती
By admin | Published: April 11, 2017 12:34 AM