दापोली : आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भावनिकदृष्ट्या घराघरांत पोहोचले. मात्र, आता या चळवळीचा प्रवास केवळ जात आणि आरक्षण इथपर्यंत मर्यादित न ठेवता तो व्यापक झाला पाहिजे. त्यामुळे यापुढे लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिकदृष्ट्या ओळखायला हवे. त्यांचे विचार लोकांनी आत्मसात करायला हवेत, असे प्रतिपादन अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. दापोली तालुक्यातील वणंद येथे शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई यांच्या जगातील पहिल्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी लाखो आंबेडकरांच्या अनुयायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूनबाई मीरा आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. संपूर्ण राज्यातून अपेक्षेपेक्षा जास्त कार्यकर्ते वणंद येथे आल्याने दापोली परिसराला चैतन्यभूमीचे स्वरूप आले होते. समाजाने यापुढे निव्वळ आरक्षणाच्या भरवशावर न राहता ही आरक्षणे बंद होणार हे लक्षात घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवे. यासाठी शिक्षण, उद्योग व्यवसायामध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढायला हवाय. काही विरोधक समाजात फूट पाडून स्वार्थ साधायचा प्रयत्न करतात, त्यांना दूर ठेवायला हवे. आंबेडकरी विचारांची चळवळ प्रत्येक कार्यकर्त्याने झोकून देऊन वाढवायला हवी, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळ आणि स्मारके बांधण्याची कामे केवळ आंबेडकर नावाच्या माणसांनीच करावयाची काय? असा प्रश्न करीत आंबेडकरांच्या नावाचा वापर स्वार्थासाठी करणाऱ्या इतरांनीही काहीतरी करायची जबाबदारी घ्यायला हवी, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात या स्मारकाचे उद्घाटन मीरा आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले. (प्रतिनिधी)
चळवळ केवळ जात, आरक्षणापुरती नको
By admin | Published: February 08, 2015 12:57 AM