ऑनलाइन लोकमत
कणकवली (सिंधुदुर्ग), दि. 24 - कणकवली तालुक्यातील चिंचवली येथे दलितवस्तीला प्रशासनाने तातडीने स्मशानभूमी उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया(ए)चे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांनी दिला आहे.
दरम्यान, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी कणकवली तहसीलदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात त्यानी म्हटले आहे की, 23 मे रोजी आपण चिंचवली येथे भेट दिली. यावेळी समाज मंदिरात तेथील ग्रामस्थानी आपले स्वागत करण्याबरोबरच सत्कारहि केला. तसेच त्यांच्या समस्या आपल्याकडे ग्रामस्थानी मांडल्या. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नारायण कुसुरकर, अजय सावडावकर, सुनील तांबे, प्रदीप कांबळे, धीरज आचरेकर, अमोल पडेकर, संदेश सावडावकर, प्रमोद जाधव, यांच्यासह चिंचवली बौद्धविकास मंडळाचे रविंद्र कांबळे, दीपक पवार, भास्कर कांबळे, सचिन पवार, रत्नमाला कांबळे, शीला पवार ,मनोज कांबळे आदी उपस्थित होते.
या समस्यांमध्ये प्रामुख्याने स्मशानभूमिच्या समस्येचा समावेश होता-
ऊस लागवडीमुळे चिंचवली येथील आंबेडकरी अनुयायांची स्मशानभूमी संपुष्टात आली आहे. त्या गावात मराठा समाजाच्या लोकांनी स्वतःपुरती स्मशानभूमी निर्माण केली आहे. या स्मशानभूमित आंबेडकरी समाजाला प्रेत जाळण्यास यापूर्वीच गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.चिंचवली ग्रामपंचायतीने तयार केलेली संबधित स्मशानभूमीच आंबेडकरी अनुयायाना देण्यात यावी. तसेच गावकऱ्यांसाठी दुसऱ्या ठिकाणी नव्याने स्मशानभूमि निर्माण करावी. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचेही तानाजी कांबळे यांनी प्रसिध्दि पत्रकात म्हटले आहे.