कणकवली: केंद्रातील भाजपा सरकार लोकशाहीच्या नावाने सुडाचे राजकारण करीत आहे. हिम्मत असेल तर निवडणुका घ्या, शिवसेना कोणाची? फैसला लोकांना करू द्या, असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. जरी श्रीरामाचे धनुष्यबान चिन्ह रावणाला मिळाले तरी रावण धनुष्य पेलवू शकत नाही. उलट तो धनुष्य त्यांच्या छाताड्यावर बसेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले.उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत. जे शिंदेसोबत गेले ते पुन्हा निवडून येणार नाहीत. कोणत्याही सभागृहात ते पुन्हा दिसणार नाहीत असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला. कणकवली येथील विजय भवन येथे आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, उपनेते गौरीशंकर खोत, युवासेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक सुशांत नाईक, निलेश उर्फ आप्पा पराडकर, अतुल रावराणे, जिल्हाप्रमुख संजय पडते, राजू शेट्ये आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.राऊत म्हणाले, आता निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. एक पक्ष गेली ५६ वर्षे घटनेप्रमाणे चालतो आणि पक्ष सोडून गेलेल्या लोकांना निवडणूक आयोग संपूर्ण पक्षाचे नाव आणि चिन्ह बहाल करतो याचा अर्थ राजकीय पक्ष म्हणजे काय? हे विचारण्याची वेळ आली आहे. तुम्हाला सत्तेची खुर्ची मिळाली म्हणजे तुमच्या हाती सर्व आले असे समजू नका, सत्ता येते आणि जाते. हे लक्षात घ्या. मोदी, शहाच्या कृपेने चोर, दरोडेखोरांना धनुष्यबाण चिन्ह शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे मोदी, शहाच्या कृपेने चोर, दरोडेखोराना निवडणूक आयोगाने दिले आहे.देशात घटना, कायदा आणि सर्वनियम पायदळी तुडवून हा निर्णय घेतला गेला. ही लोकशाहीची व्याख्या नाही. सगळे विषय खोक्यामध्ये होत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आम्ही खचलो नाही, आम्ही शिवसैनिक खचणार नाही. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत. पाळीव कुत्र्याने भाकरी पळवली, म्हणून कुत्रा मालक होऊ शकत नाही. कारण मालक तो मालकच असतो. भाजपच्या महाशक्ती विरुद्ध लढाईकालच्या निकालानंतर राज्यातील जनतेमध्ये भावनिक वातावरण आहे. चीड निर्माण झाली आहे. पश्चिम बंगाल मध्ये मोदी – शहा यांनी असेच वातावरण केले होते. त्यावेळी जनतेने भाजपला जागा दाखवलेली आहे असा टोला राऊत यांनी लगावला. राज्यात भाजपने खेळ सुरु केला. मिंदे गट आणि शिवसेना अशी लढाई नाही. त्यामागे भाजपची महाशक्ती विरुद्ध आमची लढाई आहे. ज्या पद्धतीने सुडाचे राजकारण केले जात आहे. मुख्य पदावर कळसूत्री बाहुल्याप्रमाणे आपली माणसे ठेवून आपल्याला हवा तसा निर्णय करून घेतले जात आहेत. न्यायव्यवस्था आणि सर्वच पदांवर नियुक्ती केली जात आहे. हा निर्णय झाला तरी पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही वेगाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भरारी घेऊ. आमच्यावर कोणताही दबाव टाकला तरी झुगारून आम्ही उभारी घेऊ, शिवसेना भवन, शाखा आणि शिवसैनिक आमचे आहेत. फक्त भाजपने शिवसैनिकांमध्ये डोकी फोडून रक्त सांडण्यासाठी हि चाल खेळली आहे. त्यामुळे निवडणुका घ्या. कोण कोणासोबत आहेत ते समजेल? असेही राऊत म्हणाले.
श्रीरामाचे धनुष्यबान चिन्ह रावणाला मिळाले, पण...; संजय राऊतांचे टीकास्त्र
By सुधीर राणे | Published: February 18, 2023 2:22 PM