कणकवली : केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी आर्थिक प्रलोभन दाखवून शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे. अशा या सत्तेसाठी लाचार झालेल्यांना धडा शिकवूया. ग्रामीण भागातील शिवसेना मजबूत होती, ती यापूढेही मजबूतच राहील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी कनेडी येथे व्यक्त केला.शिवसेनेच्या नाटळ, सांगवे, हरकुळ बुद्रुक विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आज, सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत आदीसह मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले, सह्याद्री पट्ट्यातील मावळा हा नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे. कोकणातील हा मावळा शिवसेनेमुळे वेगवेगळ्या पदावर पोचला. मात्र, काही लोकांनी गद्दारी केली. गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा शिवसेनेच्या लोकांनी दाखवलेली आहे. आताही तीच परिस्थिती राहील. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळेच या भागातील अनेक प्रश्न आम्ही गेल्या पाच वर्षात सोडवू शकलो. नरडवे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कुंभवडे धरणाची कामही पुढच्या वर्षी पूर्ण होईल. त्यामुळे या भागात सिंचन क्षेत्र वाढवून हा भाग सुजलाम सुफलाम होईल.आमदार नाईक म्हणाले, या भागामध्ये शिवसेनेची सत्ता कायम होती. याही पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, ग्रामपंचायतची सत्ता शिवसेना मिळवेल. इथला शिवसैनिक नेहमीच पक्षाच्या बाजूने राहिला आहे. तो कुठल्याही दबावाला बळी पडलेला नाही. यावेळी गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते यांनीही मार्गदर्शन केले.
सत्तेसाठी लाचार झालेल्यांना धडा शिकवूया - खासदार विनायक राऊत
By सुधीर राणे | Published: August 29, 2022 3:56 PM