शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. या निमित्तानं राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन नतमस्तक होत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली होती. त्यानंतर आज ट्विट करत साहेब आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मात्र ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
बाळासाहेबांशी बेईमानी करायची आणि आणि निर्लज्जपणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक व्हायचं, हा ढोंगी आणि नाटकीपणा मिंदे गटाने चालवला आहे. हे सगळं बाळासाहेब स्वर्गातून पाहत आहेत. ते नक्कीच त्यांना धडा शिकवतील, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
अफजलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा काढलेला पूर्णाकृती पुतळा हा प्रतापगडावरती बसविण्यात येणार आहे. यावर देखील विनायक राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांचा जो इतिहास आहे तो प्रदर्शित करायलाच पाहिजे. एवढं चांगलं काम असेल, तर त्याला शिवसेना कधी आडकाठी करणार नाही. मात्र मतांची बेरीज करण्यासाठी जर हा निर्णय घेत असतील तर त्यात ते कधीच यशस्वी होणार नाहीत, असा टोला विनायक राऊतांनी लगावला आहे.