वैभववाडी : सलग दुस-यांदा खासदार झालेले विनायक राऊत वैभववाडी तालुका दौ-यावर आले असता त्यांनी पंचायत समितीमध्ये सत्यनारायणाचे दर्शन घेतले. त्यावेळी तिथे पूजेनिमित्त सुरू असलेल्या भजनात गजर गाताना दंग होऊन गेल्याचे पहायला मिळाले. वैभववाडीतील दौ-यात राऊत यांनी पंचायत समितीला भेट देत श्रीसत्यनारायणाचे दर्शन घेतले. ते पंचायत समितीत पोहोचले तेव्हा तेथे भजन सुरू होते. त्यामुळे तीर्थप्रसाद घेतल्यावर बुवांच्या शेजारील खुर्चीत राऊत स्थानापन्न झाले. त्यांना कार्यकर्त्यांसह पंचायत समितीच्या कर्मचा-यांनी पेटीवर भजन गाण्याचा आग्रह धरला. त्यामुळे ते बुवांच्या खुर्चीत बसून गाऊ लागले.
'काय तुझ्या पंढरीचा वर्णू मी महिमा रे, धन्य धन्य संतजण; धन्य चंद्रभागा!' हा अभंग गाऊन खासदार राऊत यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यामुळे भजन मंडळाचे सदस्यांत उत्साह दिसून येत होता. भजनानंतर सभापती दालनात पंचायत समितीच्या वतीने सभापती लक्ष्मण रावराणे व सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी राऊत यांचा सत्कार केला. त्यावेळी राऊत यांनी सभापती रावराणे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.