सावंतवाडी : राज्यात वनविभागाला जेवढा निधी आला नाही तेवढा निधी एकट्या सिंधुदुर्गला तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यामुळे आला आहे. या निधीचा वापर चांगल्या पद्धतीने करा, अन्यथा तुम्ही सोन्यासारखी नोकरी गमावून बसाल, असा सज्जड दमच खासदार विनायक राऊत यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यासमोर उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना दिला.
यापूर्वीच्या वनअधिकाऱ्यांच्या जेवढ्या तक्रारी आल्या नाहीत तेवढ्या तक्रारी माझ्याकडे आता आल्या आहेत. मी तुमची चौकशी करण्यासाठी पत्र दिले आहे, असेही राऊत यांनी सांगितले. यावेळी वनमंत्री राठोड यांनी तुमच्या पत्राप्रमाणे मी चौकशी करतो असे राऊत यांना सांगितले.सावंतवाडी विश्रामगृहावर खासदार विनायक राऊत व अरुण दुधवडकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी तेथे आंबोलीहून गोव्याकडे जाण्यासाठी वनमंत्री संजय राठोड आले होते. त्यांच्यासोबत आमदार दीपक केसरकर हेही होते. तसेच उपवनसंरक्षक समाधान चव्हाण व वनविभागाचे अधिकारी होते.
सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी सिंधुदुर्गमध्ये आरा गिरणींबाबत होत असलेला गैरप्रकार खासदार राऊत यांना सांगितला. त्यानंतर राऊत हे त्यांना तुम्ही थांबा असे सांगत असतनाच वनमंत्री राठोड विश्रामगृहावर दाखल झाले.यावेळी राऊत यांनी सिंधुदुर्गच्या वनपर्यटनाची माहिती व तेजस ठाकरे यांनी आंबोली येथे येऊन प्राण्यांचा केलेला अभ्यास याची माहिती मंत्री राठोड यांना दिली. ही चर्चा सुरू असतानाच सिंधुदुर्गमध्ये चांदा ते बांदा योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला. मात्र, अधिकाऱ्यांनी हा निधी योग्य पद्धतीने वापरला नाही, असे राऊत यांनी राठोड यांच्या निर्देशनास आणू दिले.तसेच त्यांनी यावेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांचीही हजेरी घेतली. ह्यनिधीचा गैरवापर टाळा. जर निधीचा चुकीचा वापर झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही मागील पाच वर्षांत तुम्हांला विचारले नाही. पण आता तुमच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची दखल घेणे मला भाग आहे. जर चुकीचे काम केले तर नोकरी गमावून बसालह्ण असे राऊत यांनी सांगितले. तसेच मी स्वत: सर्व कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत असे राठोड यांना सांगितले. मंत्री राठोड यांनीही मी आपल्या पत्राप्रमाणे चौकशी करतो, असे सांगितले.आडव्या आरा गिरण्यांना परवानगी का दिली याचा जाब चव्हाण यांना त्यांनी विचारला. त्यावर तो माझा प्रश्न नाही. नागपूर कार्यालयाने दिला आहे, असे उत्तर चव्हाण यांनी दिले. त्यावर माझे पत्र घ्या आणि प्रस्ताव मागे घ्या असेही खासदार राऊत यांनी सांगितले.