कुडाळ : एमआरईजीएस योजनेतील जाचक अटींमुळे पीक लागवडीवर मर्यादा पडत असल्याने ही योजना बंद करून शेतकऱ्यांच्या फायद्याची व पूर्वीचीच रोजगार फळ लागवड योजना सुरू ठेवावी, यासाठी ‘एमआरईजीएस’चे उपायुक्त मोहन वाघ शासनाकडे प्रस्ताव देणार असल्याची माहिती कुडाळ तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ यांनी बोलताना दिली. यावेळी आर. पी. निर्मळ म्हणाले, पुणे येथील एमआरजीईएसचे उपायुक्त मोहन वाघ हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, गुरुवारी ते कुडाळच्या दौऱ्यावर होते. कुडाळच्या दौऱ्यात त्यांनी डिगस, पणदूर, कडावल व निरुखे येथील काजू, नारळ तसेच अन्य पिकांच्या बागायतीची पाहणी, योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरींची तसेच सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ, प्रभारी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, मंडल कृषी अधिकारी एम. व्ही. देसाई, कृषी पर्यवेक्षक एम. बी. मराठे, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या दौऱ्याची माहिती देताना तालुका कृषी अधिकारी निर्मळ म्हणाले की, शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी कृषी विकास ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. मात्र, या योजनेच्या जाचक अटींमुळे लागवड करताना शेतकऱ्यांवर मर्यादा पडतात, असे मत उपायुक्त मोहन वाघ यांनी व्यक्त केले. तसेच एमआरईजीएस योजना बंद करून १९९० पासून सुरू असलेली, मात्र, आता गेल्या वर्षी बंद करण्यात आलेली रोजगार हमी फळ लागवड योजना पुन्हा सुरू व्हावी, याकरिता प्रस्ताव पाठविणार असल्याचे मत मोहन वाघ यांनी व्यक्त केले असल्याची माहिती निर्मळ यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘एमआरईजीएस’च्या अटी जाचक
By admin | Published: January 20, 2015 9:17 PM