कणकवली : कणकवली तालुक्यातील वागदे, हळवल, कसवण, शिरवल या गावांमध्ये काल, गुरूवार सायंकाळपासून अचानक महावितरणनेवीज पुरवठा खंडीत करत भारनियमन सुरू केले. त्यामुळे तेथील ग्रामस्थ संतप्त झाले. कणकवलीतील वीज वितरणाच्या सबस्टेशनवर धडक देत संबंधित कर्मचार्यांना ग्रामस्थांनी जाब विचारला. उशिरापर्यंत अधिकारी तेथे न आल्याने ग्रामस्थ संतापले होते.नळयोजनेचे वीज बिल थकीत असल्याने त्याच फिडरवरील गावांमध्ये लोडशेडींग सुरू करण्यात आले आहे. कणकवलीत वीजपुरवठा सुरळीत असताना आमच्या गावांवर अन्याय का? असा सवाल वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी विचारला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी सबस्टेशनला धडक दिली. सबस्टेशनमधील कर्मचार्यांसोबत ग्रामस्थांची खडाजंगी झाली. जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.त्यानंतर सबस्टेशनमधील कर्मचार्यांनी संबंधित अधिकार्यांना याबाबतची माहिती दिली. सायंकाळी ७ ते रात्री १२ आणि पहाटे ५ ते दुपारी २ अशा वेळेत भारनियमन केले जाणार असल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर त्या गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र पहाटे पुन्हा वीज पुरवठा खंडीत केला जाणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.यावेळी हळवल सरपंच दीपक गुरव, राजू राणे, संदीप सावंत, शिवा राणे, अरूण राणे, रोहित राणे, प्रभाकर चव्हाण, बंटी राणे, प्रथमेश राणे, राजन धुरी, अविनाश राणे, विराज तावडे, विठ्ठल सावंत, सुभाष राणे, राजन तांबे आदी उपस्थित होते.
कणकवलीत महावितरणने अचानक सुरू केले भारनियमन, ग्रामस्थ झाले आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 2:21 PM