कणकवली : एसटी महामंडळाने डिझेल, स्पेअरपार्टच्या वाढत्या दरामुळे भाडेवाढ केली असून याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. १ जूनपासून ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. कणकवलीवरून मुंबईला जाण्यासाठी नवीन भाडेवाढीमुळे आता प्रवाशांना साध्या गाडीसाठी जादा ११ रूपये तर निमआराम बससाठी जादा २० रूपये मोजावे लागणार आहेत. एसटीने २.५ टक्के भाडेवाढ लागू केली असून प्रत्यक्षात अडीच स्टेजनंतर म्हणजेच १५ किलोमीटर १ रूपयाने भाडेवाढ झाली आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवासाच्या तुलनेत लांब पल्ल्याचा प्रवास अधिक महागला आहे. त्यामुळे एसटीपासून प्रवासी काही प्रमाणात दुरावण्याची शक्यता आहे. या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाला १०० कोटी रूपयांचे उत्पन्न मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाडेवाढीमुळे एसटीचा जिल्ह्यांतर्गत प्रवास १ ते ५ रूपयांनी महागणार आहे. वारंवार होणार्या एसटीच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या भाडेवाढीबरोबरच एसटी महामंडळाने आपल्या सुविधांमध्येही सुधारणा करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. (वार्ताहर)
मुंबईसाठी जादा ११ रूपये मोजा!
By admin | Published: June 03, 2014 1:43 AM