कणकवली : परुळे-चिपी येथील सिंधुदुर्गविमानतळावर येत्या १८ एप्रिलपासून एअर अलायन्सची मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत. एअर अलायन्स बरोबरच इंडिगो विमान कंपनीची सेवा सुरू करण्याबाबत युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली.याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी चिपी विमानतळाबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल, असे माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांना आश्वासीत केले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून सिंधुदुर्ग-पुणे विमान वाहतूक सुरू झाली आहे.गेले काही महिने चिपी ते मुंबई ही नियमित सुरू असलेली सेवा बंद झाली होती. ही सेवा पुन्हा मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सुरू करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे, यासाठी खासदार नारायण राणे आग्रही होते. त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू, तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्त्वाची आहे, तसेच विमानतळावरील अन्य सेवा, सुविधा, समस्या यांकडे लक्ष वेधले होते.यानंतर वेगाने कार्यवाही होत सिंधुदुर्ग विमानतळावरील अनेक सेवा-सुविधामध्ये बदल करण्यात येत आहेत. यामुळे येत्या १८ एप्रिलपासून मुंबई-चिपी- मुंबई ही एअर अलायन्सची विमान सेवा दर शुक्रवारी सुरू होणार आहे. याबरोबरच इंडिगो या कंपनीची विमान सेवा मार्ग लवकरच जाहीर केला जाणार आहे. काही तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर त्याची माहिती जाहीर होईल. पुणे- सिंधुदुर्ग-पुणे ही सेवा गेल्याच आठवड्यापासून सुरू झाली आहे.अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबईदरम्यान उड्डाणे सुरू केली होती. या आरसीएसचा कालावधी ३ वर्षांचा होता, जो ऑक्टोबर २०२४ मध्ये संपला. उड्डाण सेवा थांबवल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाइन वापरकर्त्यांवर परिणाम झाला आहे. मुंबई ते चिपी सेवा कार्यान्वित असताना पर्यटकांना, जिल्हावासीयांना मोठा लाभ होत होता. पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गासाठी आरसीएसची मुदत आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी, सिंधुदुर्गासाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी.अशी मागणीही खासदार राणे यांनी केली आहे.
सिंधुदुर्गकरांसाठी खुशखबर; मुंबई-चिपी विमानसेवा १८ पासून सुरू होणार, खासदार नारायण राणे यांनी दिली माहिती
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 4, 2025 19:12 IST