लातूर : लातूर जिल्ह्यातील प्रवाशांना थेट मुंबई जाण्यासाठी लातूर आगारातून बसची सोयच नाही. मंत्रालयीन कामासाठी तसेच मुंबई सहलीसाठी लातूरहून दररोज हजारो प्रवासी जातात़ मात्र एसटी महामंडळाने लातूर विभागातून एकही थेट गाडी मुंबईला सोडलेली नाही़ यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सचा बोलबाला आहे़ उदगीर आगारानेही दोन वर्षांपासून बस बंद केल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा झाला आहे़ लातूर आगारात लांब पल्ल्याचा प्रवास करुन प्रवासी सेवा देणाऱ्या बसेसच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ आवश्यकता असेल तिथे लातूर आगारातून बस दिली जाईल, असे आश्वासन देणाऱ्या आगार प्रमुखाने लातूर आगारातून १११ बसेसद्वारे प्रवासी सेवा देणे सुरु केले आहे़ यामध्ये लांब पल्ल्याच्या बसेस ३२ आहेत़ यामध्ये लातूर-पुणे मार्गावर १०, लातूर-औरंगाबाद ६, लातूर-कोल्हापूर ४, लातूर-हैदराबाद ३, लातूर-निजामाबाद २ यासह इतर ठिकाणी अशा एकूण ३२ बसेसच्या माध्यमातून प्रवासी सेवा सुरु केली आहे़ परंतु, ‘जिवाची मुंबई’ करण्याची ईच्छा असणाऱ्या लातूरकरांना मात्र मुंबई बस सेवेपासून वंचित रहावे लागत आहे़ इतर आगारातून नांदेड, उरन, पनवेल, देगलूर या आगारातून मुंबईला जाण्यासाठी बसेस आहेत़ परंतु, स्वतंत्र लातूरहून जाणारी मुंबई बस लातूर विभागातील पाचही आगारात सुरु करण्यात आली नाही़ यापूर्वी उदगीर-बोरवली बस सुरु होती़ परंतु, तीही बस उत्पन्नातील तोट्यामुळे विभाग नियंत्रकाच्या आदेशानुसार गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आली आहे़ त्यामुळे मंत्रालयीन कामासह इतर कामासाठी ये-जा करणाऱ्या मुंबई बसच्या अभावी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे़ महामंडळाने बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे़ लातूर जिल्ह्याची लोकसंख्या २४ लाख असताना या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईला लातूरहून एकही बस नसल्याने प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे़ (प्रतिनिधी)
लातूर विभागातून मुंबईला बस नाही
By admin | Published: November 29, 2015 11:12 PM