कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत कणकवली शहरालगत असलेला जानवली नदीवरील ब्रिटिशकालीन पूल मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आला. गेली ८५ वर्षे या पुलावरून वाहतूक सुरू होती. या पुलावर आता हातोडा बसल्याने नागरिकांच्या मनात पुलाबाबतच्या फक्त आठवणीच उरणार आहेत.
मुंबई व गोवा ही दोन शहरे रस्तामार्गे जोडण्यासाठी ब्रिटिशांनी सन १९३० पासून ठिकठिकाणी कोकणातील नद्यांवर पुलांची उभारणी सुरू केली होती.यामध्ये जानवली नदीवरील पुलाचा समावेश होता. या पुलाचे काम १९३१ मध्ये सुरू झाले. ४ नोव्हेंबर १९३४ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी कार्यान्वित झाला. या पुलासाठी त्यावेळी १ लाख ३७ हजार ६६९ रुपये अंदाजित खर्च धरण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात १ लाख २२ हजार ५०० रुपये एवढा खर्च या कामासाठी आला. गॅनन डंकर्ले आणि कंपनीच्या अभियंत्यांनी या पुलाच्या उभारणीसाठी अथक परिश्रम घेतले होते .
पुलाचे तत्कालीन अभियंता ए. एच. व्हाईट, एच. जे. एस. कझिन्स आणि एस. ए. मिर्झा, पा. कृ. शिंदे, कृ. जा. मोहिते यांच्या देखरेखीखाली या पुलाचे काम करण्यात आले. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते.
त्यानंतर या पुलावरून कित्येक टनांची अवजड वाहतूक अव्याहतपणे सुरू होती. महामार्ग चौपदरीकरणात मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वच ब्रिटिशकालीन पूल तोडले जात आहेत. यापूर्वी कणकवली शहरालगतच्या गडनदीवरील पूल तोडून तेथे तीन पदरी दोन पूल बांधण्यात आले आहेत. जानवली नदीवरदेखील २०१४ मध्ये नव्या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले; मात्र मुख्य कंपनी आणि पोट ठेकेदार यांच्या वादात या पुलाचे काम गेली पाच वर्षे रेंगाळले होते.
अखेर महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने गेल्या महिन्यात नव्या पुलाचे काम पूर्ण केले आणि त्यावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर ब्रिटिशकालीन पूल तोडण्याची कार्यवाही करण्यात आली. या दोन्ही पुलांच्या आता फक्त आठवणीच उरल्या आहेत.