कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवलीत गांगोमंदिर ते शासकीय विश्रामगृहापर्यंत उड्डाणपूल होत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. मात्र, प्रकल्पबाधितांच्या समस्या अजूनही तशाच असून लोकप्रतिनिधीही गप्प आहेत. पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होणार असून त्यांचे निराकरण त्यापूर्वी होणे आवश्यक आहे.
कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया, रुंदीकरण, अतिक्रमण हटाव करीत असताना सुरुवातीला मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून विरोध झाला. प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्यासाठी लढा उभा राहिला. त्यानंतरच्या काळात सर्व्हिस रस्ते, खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी यासाठीही आंदोलन झाले.
अधिकाऱ्यांवर चिखलफेकही झाली. त्यानंतर कणकवली शहरातील उड्डाणपुलाचे काम मोठ्या गतीने सुरू झाले. कोरोना विषाणूच्या संकटामुळे संचारबंदी लागू केल्याने परत हे काम बंद ठेवावे लागले होते. आता परत या कामाने वेग घेतला आहे. कणकवली शहरातील विकासाच्या या सेतूला खºया अर्थाने नवी झळाळी प्राप्त होताना दिसत आहे.
कणकवली शहरात वाहतूक कोंडीला या उड्डाणपुलामुळे कायमस्वरुपी तोडगा निघणार आहे. कणकवली नरडवे नाका ते एस. एम. हायस्कूलपर्यंतच्या पिलरचे काम पूर्ण झाले आहे. काही भागात वाय आकाराचे पिलर उभे केल्यानंतर उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या स्लॅबच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. काही ठिकाणचे स्लॅब पूर्ण झाले आहेत. मे अखेरपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेकेदाराने ठेवले होते.
परंतु लॉकडाऊनच्या काळातील जवळजवळ एक महिना काम बंद ठेवावे लागल्याने ते शक्य होणार नाही. तरीही आता वेगाने उड्डाणपुलाच्या स्लॅबचे काम कणकवली शहरात सुरू आहे.महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना अरुंद सर्व्हिस रस्ते, बंद पथदीप, अधूनमधून रस्त्यावर पडणारे खड्डे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तर अनेक प्रकल्पबाधितांना मोबदला न मिळाल्याने तेही अडचणीत सापडले आहेत. तर संबंधित जागेवरील काम रखडले आहे. त्यामुळे शहरातील सर्व्हिस रस्ते पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होऊ शकलेले नाहीत. परिणामी असलेल्या रस्त्यावर अनेकवेळा वाहतूक कोंडीचा अनुभव वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना येत आहे. या समस्येतून आपली सुटका कधी होणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक राजकीय पक्षांनी आपली भूमिका मांडली होती. आता महामार्ग उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असतानादेखील त्या पुतळ्याचा प्रश्न ह्यजैसे थेह्ण स्थितीतच असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे आव्हान!
- सिंधुदुर्गात जोरदार पाऊस पडत असतो. त्यामुळे पावसाळ्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणे मोठ्या जोखमीचे आहे. या चौपदरीकरणांतर्गत कणकवलीत उड्डाणपुलाचे काम सुरू असून पावसापूर्वी ते पूर्ण करण्याचे आव्हान ठेकेदार कंपनीसमोर आहे.
- शहरातील महामार्गालगतच्या ओहोळांची साफसफाई करावी लागणार आहे. ती न केल्यास पावसाचे पाणी तुंबून अनेक इमारतींमध्ये ते घुसण्याची शक्यता आहे.