सावंतवाडी : आजीला का मारहाण करतेस म्हणून विचारावयास गेलेल्या भाच्यालाच मामीने मारहाण केल्याने भाचा संदेश श्यामराव पाटील (वय १३) याने चंदगड-कन्नूर येथील घर सोडून चक्क गोवा गाठण्याचे ठरवले. मात्र, सावंतवाडीजवळ येताच त्यांच्याकडील पैसे संपल्याने अखेर तो माडखोल येथील सावली धाब्यावर उतरला आणि तेथे बसला असताना स्थानिक ग्रामस्थांनी त्यांची विचारपूस करीत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला संदेश पाटील यांचे आईवडील कामानिमित्त मुंबईला असतात, तर संदेश हा आपल्या मामाकडे चंदगड-कन्नूर (जि. कोल्हापूर) येथे राहतो. तो इयत्ता नववीत शिकत असून रविवारी रात्री संदेशाच्या मामीने आपल्या सासूला शिवीगाळ करीत माराहण केली. त्यामुळे संदेश चांगलाच संतापला व आजीला माराहाण का करते असे विचारले. त्यामुळे मामीने संदेश याला माराहण केली. आपणास मामीकडून सतत मारहाण होते. आपले आईवडिलही मुंबईला असतात, त्यामुळे आपण मामाचे घर सोडलेले बरे या हेतूने संदेश याने सोमवारी सकाळी चंदगड येथे एका ट्रकमध्ये बसून गोवा गाठण्याचे ठरवले. पण या ट्रक चालकाने त्याला सावंतवाडी नजीक माडखोल येथे उतरवले. तो दुपारपासून माडखोल येथील सावली धाब्याजवळ बसून होता. स्थानिक ग्रामस्थांनी संदेश यांची चौकशी केली असता त्याने घडलेला प्रकार ग्रामस्थांना सागितला. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी संदेश याच्याकडून माहिती घेतली असता, तो गोवा येथे हॉटेलमध्ये काम करण्यास जाणार होता. पण त्याच्याकडील पैसे संपल्याने तो माडखोल येथे उतरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संदेशच्या मामाशी संपर्क केला असता संदेशचे मामा कन्नूर येथून सावंतवाडीकडे येण्यास निघाल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
मामीची मारहाण; भाच्याने सोडले घर
By admin | Published: September 14, 2015 11:45 PM