वेंगुर्ला : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार सध्या वेंगुर्ला शहरात सकाळी ११ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवावी अशी सूचना आहे, असे असताना गेल्या चार दिवसात वेळेनंतर दुकाने सुरू ठेवलेल्या चार दुकानदारांवर वेंगुर्ला नगरपरिषदने कारवाई केली असून त्यांच्याकडून १,८०० रुपये दंड वसूल केला आहे.दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन चालू आहे. त्याअनुषंगाने बाजारपेठेत सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवावेत असे आदेश आहेत. वेंगुर्ला नगरपरिषदेने याबाबत शहरात रिक्षा फिरवून जनजागृती केली होती. मात्र, तरीही अकरानंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई सुरू आहे.
पिराचा दर्गा येथील दोन, दाभोली नाका येथील एक, खर्डेकर रोडवरील एक आणि भटवाडी येथील टाइल्स दुकानावर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई केली. ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. अमित कुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल तसेच स्वप्निल कोरगावकर, राहुल कांबळे, संतोष जाधव आणि पोलीस कर्मचारी या पथकाने केली.