देवगड : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर सुऱ्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना देवगड तालुक्यातील महाळुंगे धनगरवाडा येथे शुक्रवार, १९ एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. पत्नी व एक मुलगा यांच्यासोबत राहत असलेल्या सुनील सदानंद पेडणेकर (५८) याने त्याची पत्नी सुप्रिया सदानंद पेडणेकर (५०) हिच्या चारित्र्याच्या संशयावरून सुऱ्याने वार करून स्वयंपाकघरातच खून केला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील पेडणेकर याची पत्नी सुप्रिया व मुलगा सिद्धेश (२७) हे दोघेही महाळुंगे धनगरवाडी येथे राहत होते. सुनील पेडणेकर हे २०२२ पर्यंत पत्नी व मुलांसमवेत मुंबईत राहत होते. मुंबईत त्यांचे स्वतःचे मेडिकल होते. ते विकून महाळुंगे येथे ते कुटुंबीयांसोबत आले. धनगरवाडा येथे घर बांधून त्या घरात तिघेही राहत होती. पेडणेकर याची पत्नी घरीच भगतगिरी (जादूटोणा) करायची. घरी येत असलेल्या लोकांवरून सुनील हा पत्नीवर संशय घेत होता. या संशयातून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती.
शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांनी स्वयंपाकघरात भांडण सुरू असतानाच त्यांचा मुलगा सिद्धेश शौचालयात गेला होता. भांडणाचा आवाज आल्यानंतर तो बाहेर आला, तेव्हा आई खाली पडलेल्या स्थितीत दिसली. वडील तिच्यावर सुऱ्याने वार करत होते, हे पण पाहिल्यानंतर सिद्धेश यांनी वडिलांना बाजूला करून त्यांच्या हातातून सुरा काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या हातालाही जखम झाली. वडिलांनी त्याच्या आईच्या मानेवर, हातावर, छातीवर सुऱ्याने वार केल्याने ती जागेवरच निपचित पडली. सिद्धेश यांनी तत्काळ महाळुंगे पोलिस पाटील आत्माराम तोरसकर व विजयदुर्ग पोलिसात या घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच, विजयदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत जाधव, विलास राठोड, गणेश भावंड, संतोष डामरे, पोलिस कॉन्स्टेबल देवेंद्र मुंबरकर, विक्रम कोयंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित सुनील सदानंद पेडणेकर याला ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करून संशयिताने खुनासाठी वापरलेला सुरा ताब्यात घेतला.झटापटीत आरोपीच्या हातालाही दुखापतदरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक थोपडे आणि कर्मचारी, तसेच ठसेतज्ज्ञ टीम दाखल झाली. त्यांनी रक्ताच्या डागाचे नमुने घेतले. या प्रकरणी विजयदुर्ग पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला. खून करताना झालेल्या झटापटीत संशयित सुनील पेडणेकर याच्या हातालाही दुखापत झाली आहे.
खुनाच्या घटनेने महाळुंगे गाव हादरलेखुनामधील संशयित सुनील पेडणेकर याचा मुलगा सिद्धेश मुंबईत असताना ग्राफिक डिझायनरचे काम करीत होता. महाळुंगे येथे आल्यानंतर तो घरातूनच काम करत होता, तर वडील हे घरीच असायचे. चारित्र्याच्या संशयावरून सुनील याने पत्नी सुप्रिया हिचा सुऱ्याने स्वयंपाकघरातच वार करून निर्घृण खून केला. खुनाच्या या घटनेने महाळुंगे गाव हादरले आहे.