सुनील गोवेकर - आरोंदा -संगीत नाटकांची सुरुवात ३१ आॅक्टोबर १८८० मध्ये अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत शाकुुंतल’ या नाटकाने झाली. त्यानंतरच्या काळात संगीत नाटकांना प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणात मिळाल्याचेही दिसून आले. रॅप, पॉपच्या जमान्यात संगीत नाटकांकडे दुर्लक्ष होता कामा नये. संगीत नाटकांचं गतवैभव पुन्हा मिळविण्याची गरज आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही कलावंत व रसिक प्रयत्न करताना दिसत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता, या संगीत नाटकांना ऊर्जितावस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. संगीत नाटक म्हटलं की, अभिनयाबरोबरच शास्त्रीय संगीताचाही अभ्यास असणे गरजेचे आहे. जिल्ह्यात शास्त्रीय संगीताचा अभ्यास करणारे गायक कलाकार गायनाबरोबरच अभियन कलाही आत्मसात करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान, कणकवली, क्षितिज इव्हेंटस, सावंतवाडी, श्री सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडी, श्रीकृष्ण कला मंच जामसंडे, होडावडे (ता. वेंगुर्ले) येथील सप्तरंग कला मंच यांच्यामार्फत संगीत नाटकांचं सादरीकरण झाल्याचे दिसून येत आहे. सावंतवाडीच्या क्षितिज इव्हेंटस्ने आतापर्यंत संगीत विद्याहरण, संगीत ययाति देवयानी अशी नाटकं लोकांसाठी सादर केली. सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडीने संगीत शारदा, श्रीकृष्ण कला मंच, जामसंडेने संत गोरा कुंभार, गीता गाती ज्ञानेश्वरी अशी संंगीत नाटके गेल्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीत सादर केली. याचे श्रेय या कलामंचांना द्यावं लागेल. संगीत नाटकांविषयी असणारा आदर यातून दिसून येतो. गेल्या चार-पाच वर्षांपासून जिल्ह्यातील काही मंडळांकडून सवेश नाट्यगीत गायन स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत शिकणारी मंडळी सवेश नाट्यगीतातून अभिनय सादर करण्याचे धाडस करीत आहेत. ही बाब भविष्यात संगीत नाटकांसाठी पोषक वातावरण निर्माण करणारी आहे. एकूणच जिल्ह्यात संगीत नाटकांसाठी होणारे प्रयत्न हे संगीत नाटकांना ऊर्जितावस्था निर्माण करणारे आहेत. संगीत शिक्षकांकडून धडे१संगीत नाटकांसाठी गायकांना शास्त्रीय संगीताचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात शास्त्रीय संगीताचे धडे देणाऱ्या गुरुंचाही महत्त्वाचा वाटा आहे. २जिल्ह्यातील अनघा गोगटे (वेंगुर्ले), नीलेश मेस्त्री (सावंतवाडी), दिलीप ठाकूर (मालवण), संदीप पेंडूरकर (कणकवली), दिगंबर लाड (बांदा), राजन माडये (कुडाळ), प्रशांत धोंड (मांडकुली), स्वप्निल गोरे (आकेरी) या संगीत शिक्षकांकडूनही मुलांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले जात आहेत. संगीत शिक्षण घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस बऱ्यापैकी वाढत जात आहे. आपल्या जिल्ह्यात संगीत नाटकांविषयी नेहमीच आवड दिसून आलेली आहे. संगीत नाटकांसाठी प्रेक्षकवर्गही बऱ्यापैकी लाभत आहे. संगीत शिकणारी नवीन मुलेही गायनाबरोबरच अभिनयाची कला आत्मसात करीत आहेत. त्यामुळे भविष्यकाळ आशावादी आहे. सद्गुरू संगीत विद्यालयाने सादर केलेल्या संगीत शारदा नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. - नीलेश मेस्त्री,संचालक, सद्गुरु संगीत विद्यालय
संगीत नाटकांना गतवैभव मिळणार
By admin | Published: December 09, 2014 8:16 PM