वेंगुर्ले : पावसाळी बेडकांचा बंदोबस्त जरूर केला जाईल. पण संदेश निकम यांच्या घरात घुसून भाजपचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केलेला हल्ला हा कायद्याच्या चौकटीतला नाही. शिवसेना या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे राहणार आहे. कोणाचा कितीही दबाव आला तरी संबंधितांवर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केली.वेंगुर्ले नगरपरिषदेच्या भाजप व शिवसेना पक्षाच्या नगरसेविकांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दुधवडकर यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस निरीक्षक शिवाजीराव खोत यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर येथील शिवसेना कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या प्रकरणातील सर्व आरोपींवर विनयभंग, घरात घुसून सामुदायिक हल्ला व मारहाणीबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. नगरसेविका सुमन निकम व संदेश निकम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शनिवारी विमानाने मुंबई येथे हलविल्याचे त्यांनी सांगितले.राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे. वैयक्तिक प्रश्नात भाजपाने राजकारण आणून कायदा हातात घेतला हे कृत्य अयोग्य आहे. निकम कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य शिवसेना करेल. तसेच पालकमंत्री दीपक केसरकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा न्याय देतील, असा विश्वास दुधवडकर यांनी व्यक्त केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, माजी सभापती बाळकृष्ण कोंडसकर, वेंगुर्ले तालुकाप्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख विवेक आरोलकर, महिला तालुकाध्यक्ष सुकन्या नरसुले, शहरप्रमुख मंजुषा आरोलकर, सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते..