दापोली : गाडीवर पोलीस असे लिहून तालुक्यातील मुरूड येथे पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांनी धुडघूस घातला आहे. यातील काही तरूण गाडीच्या टपावर, तर काही गाडीत अर्धनग्न अवस्थेत नाचत असल्याने त्यांना गावातील प्रतिष्ठीत नागरिक व पोलिसांनी चांगलाच चोप दिला.पर्यटनासाठी खास आकर्षण ठरत असलेल्या दापोलीतील मुरूड गावाचे नाव पहिले गणले जाऊ लागले. या ठिकाणी पर्यटकांची रोज मोठ्या प्रमाणात येत असतात. मुरूड येथे सोमवारी सकाळी ८.१५च्या सुमारास एक गाडी पर्यटनासाठी आली. त्या गाडीच्या समोरच्या काचेवर ‘पोलीस’ असे मोठ्या अक्षरात लिहिलेले होते. आतमध्ये डिस्को गाणी लावण्यात आलेली होती. या गाण्यांमुळे स्थानिक ग्रामस्थांना त्रास झाला. हे पोलीस असूनही गाडीमध्ये अशा प्रकारची गाणी मोठ्या आवाजात लावून शहरातून फिरत असल्याने त्रास होत आहे. सध्या दापोली तालुक्यामध्ये पर्यटनाकरिता दादा, वडील वा अन्य नातेवाईकांच्या पोलीसपदाचा वापर करून अनेकजण येत आहेत. याचा प्रत्यय नुकताच मुरूडच्या ग्रामस्थांना आला आहे. हे पर्यटक हे आपल्या गाडीत मद्यधुंद अवस्थेत होते तर एकजण चक्क गाडीच्या टपावर बसून नाचत होता. हे तेथील प्रतिष्ठीत नागरिकांनी पाहिले व पुढे जाऊन बघितले, तर गाडीच्या काचेवर पोलीस असा मोठ्या अक्षरात बोर्ड लिहिलेला आढळून आला. त्याचबरोबर गावात असलेल्या हर्णै विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांना पाचरण करण्यात आले व या प्रकारची तपासणी करण्यात आली. खरंच पोलीस आल्याचे पाहून साऱ्या पर्यटकांची बोलतीच वळली. तुमच्यात पोलीस कोण आहे, याची विचारणा करण्यात आली. ‘साहेब माझा भाऊ पोलीस आहे, आम्ही नाही’, हे स्थानिक पोलिसांनी ऐकताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. या ‘फेक’ पोलीस गाडी चालवणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करून त्यांच्याकडून दंड करण्यात आला. काही दिवसांपूर्वी कर्दे येथेही अशाच प्रकारच्या पर्यटनासाठी आलेल्यांची एक गाडी समुद्राच्या पाण्यात बुडाली होती. ही गाडी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने व जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढून वाचवले होते. त्या गाडीतदेखील पोलीस असा फलक होता. परंतु गाडी बराच काळ पाण्यात असल्याने हा फलक समुद्राच्या पाण्यात वाहून गेला होता. हे पोलीस अधिकारी आहेत तर मग यांना पर्यटनाचे नियम व सागरी किनाऱ्याचे नियम माहीत नसतात का? असे प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. या साऱ्या फेक पोलिसांमुळे खऱ्या पोलिसांवर परिणाम होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे. पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)गाड्यांची हुलकावणीपोलीस लिहिलेल्या गाड्यांचा वावर दापोली तालुक्यात दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दापोलीत येणारे अशा प्रकारचे पर्यटकदेखील येथे स्वच्छता कर वसूली करणाऱ्यांनादेखील हुलकावणी देऊन निघून जातात. तसेच खरंच पोलीस असतात ते मात्र आपला आयडीकार्ड दाखवूनच पुढे जात असल्याचे व कर देऊनच पुढे जात असल्याचे स्थानिक स्वच्छता कर वसूल करणारे सांगतात.
पोलीस लिहिलेल्या गाड्यांमध्ये ‘नाचरी’ पोरं
By admin | Published: November 15, 2016 12:18 AM