ओरोस : देवगड तालुक्यातील नाद भोळेवाडी शाळा निर्लेखित झाली असूनही नवीन शाळा बांधकाम यादीत या शाळेचे नाव नसल्याची बाब जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी बांधकाम समिती सभेत उघड केली. तसेच शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम ठरवून दिलेल्या यादीत या शाळेचे नाव होते. मात्र, सभापती दालनातून जेव्हा यादी बाहेर पडली तेव्हा या शाळेचे नाव वगळण्यात आल्याचा आरोपही नारकर यांनी केला आहे.माझ्यावर अन्याय होतो ते मी सहन करतो. मात्र, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आपण सहन करणार नसल्याचे सांगत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थी व पालकांसह जिल्हा परिषदसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही नारकर यांनी बांधकाम समिती सभेत दिला.जिल्हा परिषद बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, समिती सदस्य जेरोन फर्नांडिस, प्रदीप नारकर, राजेश कविटकर, रेश्मा सावंत, श्रीया सावंत आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती व नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठीची यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून निश्चित करून अंतिम मान्यतेसाठी पालकमंत्र्यांच्याकडे पाठविण्यात येते. देवगड तालुक्यातील नाद भोळेवाडी शाळा पूर्णतः नादुरूस्त झाल्याने तिचे निर्लेखन करून नवीन शाळा बांधकाम व्हावे यासाठी शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार शिक्षण विभागाकडून जिल्ह्याची यादी तयार करण्यात आली. त्या यादीत या शाळेचे नाव समाविष्ट होते.
मात्र, आता मंजूर यादीत या शाळेचा समावेश नसल्याचे सदस्य प्रदीप नारकर यांनी सांगत शाळा बांधकाम न केल्यास येथील विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर यादी पालकमंत्र्यांनी मंजूर केली असून ती मंजुरीच्या वेळी आपण पालकमंत्र्यांना सांगून हे काम मंजूर करून घेतले पाहिजे होते, असे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगितले.उपोषण छेडणारशिक्षण विभागाने तयार केलेल्या यादीत नाद भोळेवाडी शाळेचा समावेश होता. मात्र, शिक्षण सभापती यांच्या दालनातून यादी बाहेर आली तेव्हा या शाळेचे नाव वगळण्यात आले असल्याचा आरोप सदस्य नारकर यांनी केला. जिल्हा परिषदेमध्ये आपल्यावर अनेक कामांमध्ये अन्याय केला जात आहे. मात्र, आता आपले ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्याय आपण सहन करणार नाही. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेसमोर उपोषण छेडणार असल्याचा इशाराही नारकर यांनी दिला आहे.