सावंतवाडी : संगीत समारोहासारखे कार्यक्रम आयोजित करून स्थानिक कलाकारांना नाट्यसंगीताची आवड निर्माण होत असते. ‘नादब्रम्ह’ च्या कार्यक्रमांना सावंतवाडी नगर परिषदेतर्फे सदैव सहकार्य मिळेल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले. चंद्रशेखर भिडे समर्पित ‘नादब्रम्ह’ संगीत समारोह या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिंगबर भिडे, सतीश शेजवलकर, शेखर पणशीकर, किशोर पै आदी उपस्थित होते. शेखर पणशीकर यांनी रसिक, आश्रयदात्यांच्या सहकार्याने पुढील वर्षी एक दिवसाचा समारोह करण्याचा मानस चंद्रशेखर भिडे यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणार असल्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात हार्मोनियम, तबला जुगलबंदी दीपक मराठे (मुंबई) व प्रसाद करंबळेकर (पुणे) यांनी राग यमन प्रस्तुत केला. तसेच नाट्यगीते व मिश्र भिन्न षड्ज या रागातील ठुमरी सादर केली. दुसऱ्या सत्रात स्थानिक कलाकारांची नाट्यसंगीत रजनी कलाकार स्वप्निलग गोरे (हुमरस), ईश्वरी तेजम (कुडाळ), दिलीप ठाकूर (मालवण), दिव्या शेवडे (सावंतवाडी) यांनी विविध लोकप्रिय नाट्यगीते सादर केली. तबलासाथ किशोर सावंत, हार्मोनियम प्रदीप शेवडे, आॅर्गन भालचंद्र केळूसकर, प्रसाद शेवडे यांनी केली. या सत्राचे निवेदन संजय कात्रे (माणगाव) यांनी केले. तिसऱ्या सत्रात बाळ आंबर्डेकर, मुंबई यांनी रागमालिका सादर केली. राग गावती तसेच भजन, सुखाचे जे सुख हा अभंग, रतिरंगी रंगे ध्यान हे नाट्यगीत, दिवे लागरे रे हे भावगीत, हे सुरांनो चंद्र व्हा हे नाट्यगीत व सर्वात्मका सर्वेश्वरा ही भैरवी सादर केली. त्यांना तबलासाथ दयानिघेश कोसंबे, हार्मोनियम राया कोरगावकर यांनी दिली. या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर पणशीकर, आभार किशोर पै यांनी मानले. (प्रतिनिधी)
‘नादब्रम्ह’ला सदैव सहकार्य मिळेल
By admin | Published: January 19, 2015 11:29 PM