प्रकाश काळेवैभववाडी(सिंधुदुर्ग): वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकाने विजयी मिरवणूक काढली. यावेळी समर्थकांनी रोहन जयेंद्र रावराणे यांच्यावर चक्क जेसीबीतून गुलाल उधळत पुष्पवृष्टी केली. सत्ता राखलेल्या भाजपपेक्षा पुरस्कृत असलेल्या रोहन रावराणे यांच्या मिरवणूकीची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत होती. 'नेता आमचा लय पावरफुल्ल' या डीजेच्या गाण्याने जयेंद्र रावराणेंच्या निवडणुकीच्या रणनितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीत १७ पैकी ९ जागा जिंकून भाजपने सत्ता राखली. त्यानंतर शहरातून घोषणा देत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली. भाजपची विजयी मिरवणूक बाजारपेठेत पोहोचताच भाजप पुरस्कृत अपक्ष निवडून आलेल्या रोहन रावराणेंची डीजेच्या दणक्यातील मिरवणूक संभाजी चौकात दाखल झाली. त्यामुळे बाजारपेठेतील सर्वांच्या नजरा रावराणेंच्या मिरवणुकीकडे वळल्या होत्या. मिरवणुकीतील 'कटाऊट्स'ची चर्चासंताजी अरविंद रावराणे आणि रोहन जयेंद्र रावराणे यांच्यात प्रभाग ८ च्या उमेदवारीबाबत समझोता होऊ न शकल्याने आमदार नीतेश राणेंनी दोघांनाही अपक्ष लढण्यास सांगितले होते. त्यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या अटीतटीच्या लढतीत रोहन रावराणेंनी बाजी मारली. विशेष म्हणजे निकाल जाहीर झाल्यावर जेमतेम पाऊण तासात त्यांची मिरवणूक निघाली. या मिरवणूकीत जेसीबीतून उधळलेल्या गुलालापेक्षा निकालाआधी मिरवणूकीसाठी सज्ज असलेल्या आभाराच्या मजकुराच्या कटाऊट्समुळे जयेंद्र रावराणे यांना रोहनच्या विषयाबद्दल असलेल्या 'काॅन्फिडन्स'ची जोरदार चर्चा रंगली.
नेता आमचा लय पावरफुल्ल, वैभववाडीत अपक्ष विजयी उमेदवाराची दणक्यात मिरवणूक; जेसीबीतून गुलाल-पुष्पवृष्टीची उधळण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 2:33 PM