महेश सरनाईकसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील चार नगरपंचायतींवर आगामी पाच वर्षांसाठी कोणाची सत्ता असणार याचा मतदारराजाने काल, बुधवारी कौल दिला. परंतु या कौलाच्या माध्यमातून तिन्ही आमदारांना मतदारांनी एक संदेश दिला आहे. मतदारांना गृहित धरून चालणारे राजकारण आगामी काळात कराल तर मतदारराजा तुम्हाला तुमची जागा दाखवेल. या निवडणूक निकालातून आवश्यक बोध घेवून लोकप्रतिनिधींनी राजकारण करावे.
केवळ एकमेकांवर टीकाटिप्पणी करत बसून करमणूक करत राहू नका. नगरपंचायत निवडणुकीकडे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. अपेक्षेप्रमाणे जिल्हा बँक निवडणुकीप्रमाणे जिल्ह्यातील भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, असे असताना कुडाळ आणि देवगड या भाजपाच्या ताब्यात असलेल्या दोन नगरपंचायती महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्या आहेत.
कुडाळात त्रिशंकु अवस्था निर्माण झाली असली तरी देशपातळीवर राष्ट्रीय राजकारणात कट्टर विरोधात असलेला काँग्रेस भाजपसोबत सत्तेत जाईल, असे वाटत नाही. जरी स्थानिक पातळीवर वेगवेगळे राजकारण असले तरी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आता कुडाळात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या हातापाया पडल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळेच त्यांनी कुडाळमध्ये निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना अत्यंत सावध भूमिका घेत आम्ही वरीष्ठांच्या निर्णयाशी बांधिल राहणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.राणेंच्या हितक्षत्रूंचे कारस्थानकणकवली या आमदार नीतेश राणे यांच्या मतदार संघातील दाेन नगरपंचायतींवर यापूर्वी राणे यांचीच सत्ता होती. म्हणजे राणे काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस आणि राणे भाजपवासीय झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपला देवगडची सत्ता राखता आली नाही. त्याची कारणे अनेक असतील परंतु राणे ज्या प्रमाणे एकहाती सगळा कारभार करत असतात ते पाहता. राणेंना शह देण्यासाठी पक्षांतर्गत काहीजण त्यांचे हितक्षत्रू म्हणून कार्यरत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवगडमध्ये त्यांच्या झालेल्या पराभवाची कारणीमिमांसा त्यांना करावे लागेल आणि आगामी काळात त्यांना त्याप्रमाणात बदल करावे लागतील.दुसरीकडे वैभववाडी नगरपंचायतीचे काही नगरसेवक निवडणुकीपूर्वी फोडून शिवसेनेत घेवूनसुद्धा शिवसेनेला येथे अपयश आले. याचा अर्थ जे भाजपा सोडून गेले ते आपल्या स्वार्थासाठी सेनेत गेले असतील असा अर्थ लावून जनतेने राणे आणि पर्यायाने भाजपाच्या पारड्यात पुन्हा एकदा पूर्ण बहुमत देत ही नगरपंचायत राणेंच्या पाठीमागे कायम ठेवली.हम करे सो, चालणार नाहीकुडाळ मतदार संघातील आमदार वैभव नाईक यांच्यासाठी कुडाळ नगरपंचायत महत्वाची होती. ते राज्यात सत्तेत आहेत. पालकमंत्री, खासदार त्यांचा आहे. असे असताना मतदार संघातील कुडाळसारख्या महत्वाच्या नगरपंचायतीवर शिवसेना एकहाती वर्चस्व प्रस्थापित करू शकली नाही. त्यांना आता काँग्रेसचा आधार घ्यावा लागणार आहे.त्यामुळे हम करे सो कायदा चालणार नाही. तुम्हाला आमच्याशिवाय पर्याय नाही. अशी दर्पोक्ती काँग्रसने ठोकायला सुरूवात केली आहे. जर सत्ता हवी असेल तर आमच्या पायापर्यंत या, अशी ताठर भूमिका केवळ दोन नगरसेवक असताना काँग्रेस घेत आहे. कारण सेनेला आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही.दोडामार्गमधील समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे भोवलेसावंतवाडी या दीपक केसरकर मतदार संघातील दोडामार्ग नगरपंचायतीत शिवसेनेने सपाटून मार खालला आहे. मागील निवडणुकीत पाच नगरसेवक होते. मात्र, आता केवळ दोनच नगरसेवकांवर त्यांना समाधान मानावे लागले. आमदार दीपक केसरकर यांच्यासाठी हा मोठा धक्का असला तरी ते प्रत्यक्षात तसे मानत नाहीत.निवडणूक निकालानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना धनशक्तीचा वापर करून भाजपाने मते घेतली असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी अशा टीकाटीप्पणीच्या मागे न राहता आत्मपरीक्षण करावे. दोडामार्गवासीयांना आरोग्य, रस्ते, नैसर्गिक समस्या मोठ्या प्रमाणावर असतानाही त्याकडे सत्ताधारी म्हणून सेनेने दुर्लक्ष केले आणि तेच त्यांना भोवले आहे.