कणकवली : शहरात स्वच्छता मोहीम राबविताना नगरपंचायत प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही. नगरपंचायत सभेच्या इतिवृत्ताची प्रत मागुनही मिळत नाही असा आरोप करीत तसेच शहरातील व्यापार्यांवर चुकीच्या पद्धतीने केलेली प्लास्टिक बंदीची कारवाई या विषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत कणकवली नगरपंचायतमधील शिवसेना तसेच भाजपच्या विरोधी नगरसेवकांनी सोमवारी सभात्याग केला.तर विरोधी पक्षाचे नगरसेवक ढोंगी आहेत. प्लास्टिक बंदीबाबतच्या सभांना ते उपस्थित होते. पण त्यासभेत त्यांनी एकही प्रश्न मुख्याधिकार्यांना विचारला नाही. फक्त नागरिकांची सहानुभूती मिळविण्यासाठी ते सभात्यागाचे नाटक करीत आहेत. या सभेच्या अजेंड्यावर चार विषय स्वच्छते विषयी असतानाही विरोधी नगरसेवकांनी चर्चेत सहभागी न होता सभात्याग करणे हे योग्य नव्हे. त्याना नागरिकांबद्दल आस्था नसल्यानेच त्यांनी ही कृती केली आहे.
विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाबाबत खुद्द नगराध्यक्षांनाही कळविण्यात आले नाही. इतिवृत्ताची प्रत वाचनासाठी नगराध्यक्ष दालनात उपलब्ध केली आहे. पण विरोधी पक्षाचे नगरसेवक तिथे येतच नाहीत अशी बाजू सत्ताधार्यांच्यावतीने या सभेत मांडण्यात आली.कणकवली नगरपंचायतीची सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष रविंद्र गायकवाड़ उपस्थित होते. तर मुख्याधिकारी मनोज उकिर्डे रजेवर असल्याने या सभेला अनुपस्थित होते.या सभेत कणकवली टेंबवाडी मध्ये रविवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचा प्रश्न प्रामुख्याने चर्चेत आला. मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊनही नगरपंचायत कर्मचारी या मोहिमेसाठी टेंबवाडीत आले नाहीत आणि साहित्यही पुरविले नाही . असे सांगत नगरसेविका मेघा सावंत यांनी नगरपंचायत प्रशासनातील गलथानपणा उघड केला. तसेच प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या हलगर्जिपणाचे उत्तर द्यावे .अशी मागणी केली.यावर ही स्वच्छता मोहिम जर नगरपंचायतीच्यावतीने राबविण्यात येत होती तर नगराध्यक्षांना का बोलावले नाही ? असा प्रश्न अभिजित मुसळे यांनी उपस्थित केला. तसेच प्रशासनाच्यावतीने भाई साटम यानी स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला टेंबवाड़ी येथे जाण्यास सांगितले होते. त्यांने तिथे संपर्क साधला असता स्वच्छता मोहीम संपल्याचे सांगण्यात आले. असे सभागृहात सांगितले.या मुद्यावरून नगरसेवक कन्हैया पारकर , रुपेश नार्वेकर , मेघा सावंत आणि बांधकाम सभापती अभिजित मुसळे, संजय कामतेकर , अबिद नाईक यांच्या मध्ये जोरदार खडाजंगी उडाली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या मोहिमेबाबत मला का सांगितले नाही ?असा प्रश्न उपस्थित केला.या मुद्यावर चर्चा सुरु असतानाच नगरसेवक सुशांत नाईक यांनी प्लास्टिक बंदीचा मुद्दा उपस्थित केला. नगरपंचायतीने केलेल्या नॉन ओव्हन पिशव्यांवरील दंडात्मक कारवाईला त्यांनी आक्षेप घेतला. या मुद्यावर कन्हैया पारकर व रूपेश नार्वेकर बोलायला लागल्यावर तुम्ही "पेरलात तेच उगवले" असे अभिजित मुसळे बोलले . त्यांच्या या वाक्याने पुन्हा सभागृहात वादंग झाला.यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तुम्ही उपनगराध्यक्ष असताना प्लास्टिक विषयी शहरात उपविधी लागू झाली .तेव्हा तुम्ही आक्षेप का घेतला नाही ?असे कन्हैया पारकर यांना विचारले. याविष्यावरुन गदारोळ सुरु असताना रूपेश नार्वेकर यानी सभेच्या इतिवृत्ताचा मुद्दा उपस्थित केला. तसेच मुख्याधिकारी अनुपस्थित असताना या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असे विचारित सभा तहकूब करण्याची मागणी केली. नगराध्यक्ष नलावडे यानी सभा तहकूब करणार नसल्याचे सांगितले.त्यामुळे या मुद्यावरूनही जोरदार हमरातुमरी होऊन विरोधी गटाच्या रूपेश नार्वेकर, मेघा सावंत, कन्हैया पारकर, सुमेधा अंधारी, सुशांत नाईक, मानसी मुंज यांनी सभात्याग केला . त्यानंतर सभेचे पुढील कामकाज चालविण्यात आले. यामध्ये नगरपंचायत निधीतून घ्यायची कामे, कणकवली शहर हांगणदारी मुक्त प्लस करणे, स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 अंतर्गत प्रचार व प्रसार करणे अशा विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.स्वच्छता अभियानमध्ये विविध क्षेत्रातील लोकांवर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींची ब्रँड अँबॅसिडर पदी नियुक्ती करावी . यामध्ये महिलांचाहि सहभाग असावा असा मुद्दा चर्चेत आला. यावेळी नगरपंचायतचे स्वच्छता कर्मचारी खरे ब्रँड अँबॅसिडर असून त्यांचे फोटो बॅनरवर लावावेत.अशी सूचना अभिजित मुसळे यांनी मांडली. त्याला सर्व नगरसेवकांनी मान्यता दिली.कंपोस्ट खत खड्डा तयार करा !कणकवली शहरात विविध प्रभागात शनिवार व रविवार अशा दोन दिवशी नगराध्यक्ष ,नगरसेवक यांच्या उपस्थितित स्वछता मोहीम राबविण्यात यावी अशी सुचना नगरसेवक अबिद नाईक यांनी मांडली . तर ज्या नगरसेवकाना शक्य असेल त्यांनी आपल्या घरी कंपोस्ट खत खड्डा तयार करावा . तसेच त्यात कचरा टाकून खत तयार करावे . त्यांचा आदर्श मग नागरिक घेतील आणि स्वच्छता मोहिमेला चांगले पाठबळ मिळेल. अशी सुचना नगरसेवक बंडू हर्णे यांनी मांडली .