कणकवली : लोकशाहीमध्ये एखाद्या चांगल्या गोष्टीचे जसे अभिनंदन करण्याची पध्दत आहे, तशीच एकाद्या चुकीच्या वतुर्णुकीची किंवा वाईट गोष्टीचा निषेध करण्याचीही पध्दत आहे. समीर नलावडे हे कणकवली शहराचे नगराध्यक्ष आहेत. त्यांनी त्याचे भान ठेवायला हवे. त्यांनी नगरपंचायत सभागृहात केलेले वर्तन शहराला भूषणावह नाही, अशी प्रतिक्रिया नगरसेवक रूपेश नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे.याबाबत त्यानी प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही दिवसापूर्वी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी हातात काठ्या घेऊन बाजारपेठेत फिरत शिविगाळ करीत वाहनांची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला होता.ते वर्तन नगराध्यक्ष पदावरील व्यक्तीला शोभत नाही. त्यामुळे त्या वर्तनाच्या निषेधाचा ठराव मी लोकशाही पध्दतीने नगरपंचायत सभेत मांडला होता. पण नलावडे यांना आपण नगराध्यक्ष आहोत याचे भान राहीले नाही. त्यांनी नगरपंचायत सभागृहात गुंडगिरी करून अर्वाच्च भाषा वापरली.
हे लोकशाहीला घातक आहे. या कृत्याचाहि मी निषेध करतो . याही पुढे मी कोणाच्याही दहशतीला भीक घालणार नाही. नगरपंचायतीच्या चुकीच्या गोष्टीचे समर्थन मी करणार नाही. माझी बांधीलकी शहरातील जनतेशी आहे. त्यादृष्टीनेच मी कार्यरत राहिन असेही त्यानी या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.