बांदा : बांदा-गोवा जुन्या हायवेवर शहरातील रामनगर येथे तब्बल पाच फूट लांबीच्या भल्या मोठया नागराजाने रस्त्याच्या मधोमध ठाण मांडल्याने दोन्ही बाजुकडून सुमारे अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला. अखेर अर्ध्या तासानंतर नागराजाने रस्त्याच्या बाजुकडील जंगलात प्रस्थान केल्यानंतर वाहतुक पूर्ववत सुरु झाली.ही घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या मार्गावर गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्यांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. सकाळी नेहमीप्रमाणे या रस्त्यावर वर्दळ होती. रामनगर येथील साईमंदिरानजीक अचानक मुंगुसाने पाठलाग केल्याने भलामोठा नागसर्प रस्त्यावर आला. सापाला पकडण्याच्या इराद्याने रस्त्यावर आलेल्या मुंगुसाने वाहनांच्या वर्दळीने तेथून जंगलात पलायन केले. मात्र नागसर्पाने तेथेच रस्त्यावरच ठाण मांडले.रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांवर तो सतत फुत्कारत चावा घेण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजुकडून वाहने थांबविण्यात आली. वाहनचालकांनी तसेच प्रवाशांनी नागाला तेथून हटविण्याचा प्रयत्न केला, मात्र नागसर्प तेथून न हटता रस्त्याच्या मधोमध राहिला. अखेर अर्ध्यां तासानंतर तो रस्त्याच्या बाजुकडील जंगलात गेल्यानंतर वाहतुक पूर्ववत सुरु करण्यात आली. तोपर्यंत वाहतुकीचा मोठया प्रमाणात खोळंबा झाला. नागसर्पाला बघण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)
नागराजाने अडविला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 11:44 PM