सिंधुदुर्ग ( मालवण ): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या विकासावर भाष्य न करता कोकणी जनतेची घोर निराशा केली आहे. 'मुक्या मुख्यमंत्र्यां'मुळे महाराष्ट्र राज्य अधोगतीकडे चालले आहे. ठाकरेंनी जनतेला दिलेली आश्वासने न पाळता सर्व कामांना स्थगिती देऊन मंत्रालयात भ्रष्टाचाराची दुकाने सरु केली आहेत. ठेकेदाराला बोलावून तोडपाणीची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून आमच्या कोणत्याही अपेक्षा नाहीत. हे सरकार गेल्याशिवाय राज्यात चांगले दिवस येणार नाहीत, असा घणाघात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केला.
आंगणेवाडी यात्रोत्सवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाविकांशी संवाद साधला नाही. याबाबत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार प्रहार केले. उद्धव ठाकरेंचे कोकणच्या विकासाला काय योगदान आहे? असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांमध्ये पैसे काढून देण्याची क्षमता नाही. त्यामुळे भराडी देवीने राज्यात लोककल्याणकारी राज्य निर्माण होण्यासाठी आशीर्वाद द्यावेत, असा टोला राणेंनी लगावला.
मुख्यमंत्री ज्या दौऱ्यावर जातात त्याठिकाणी विकासासाठी भरघोस निधी देऊन जातात, असा अलिखित नियम आहे. मात्र, राज्याचा मुका मुख्यमंत्री आंगणेवाडीत पाहुण्यासारखा आला आणि दर्शन घेऊन निघून गेला. ज्या माणसाकडे देवाला द्यायला वेळ नाही तो जनतेला काय देणार ? स्थगिती सरकारने तीन महिन्यांत कोणती विकासकामे केली हे सांगावे,असे राणे म्हणाले.
मी मुख्यमंत्री असताना जे दिले ते या मुख्यमंत्र्याला लिहून काढता येणार नाही. मी कॅबिनेट मंत्री असताना सिंधुदुर्गात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्गसाठी ५ हजार २२५ कोटी रुपये दिले. आता पुन्हा सिंधुदुर्गात होणाऱ्या मिनी कॅबिनेटमध्ये दोन मंत्र्यांची बैठक आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती निधी मिळणार हे पाहू, असेही राणे म्हणाले.
विकासकामांवरच्या स्थगिती उठवा
शब्दाला न जागणारा माणूस, दिशाभूल करणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून आमच्या कोणत्याच अपेक्षा नाहीत. त्यांनी केवळ विकासकामांना दिलेल्या स्थगिती उठवाव्यात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा नियोजनमधून २२५ कोटींची केलेली कपात रद्द करुन भरघोस निधी द्यावा, असे राणेंनी सांगताना नाणार प्रकल्प करणार नाही, असे सांगणारे ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या मुखपत्रात जाहिरात देऊन नाणार येथेच प्रकल्प होत असल्याचे दाखवून दिले आहे. अशीही टीका केली.