Narayan Rane: अर्थमंत्री येऊन पराभव करुन जातात, ही यांची अक्कल; नारायण राणेंचा अजित पवारांना सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 04:32 PM2021-12-31T16:32:32+5:302021-12-31T16:33:27+5:30
Narayan Rane: संस्था वाढवायला अक्कल लागते. डोकं लागतं. पण बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये गेले असताना केली होती.
संस्था वाढवायला अक्कल लागते. डोकं लागतं. पण बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये गेले असताना केली होती. त्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. सिंधुदुर्ग मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज भाजपानं बाजी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत राणेंनी ठाकरे सरकार आणि अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
"सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक कायद्याचा आणि पोलिसांचा गैरवापर करुन जिंकण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलीस यंत्रणेला हाताळी बाळगून निवडणूक जिंकण्याचा मानस कोकणवासियांनी फोल ठरवला आहे. नितेश राणेंचा जामीन अर्ज चार चार दिवस कोर्टात चालतो. माझ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. इथं डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थमंत्री येऊन अक्कल काढतात आणि पक्षाचा पराभव करुन जातात", असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
"आम्ही अक्कल वापरुच निवडणूक जिंकली. जनतेनं पण अक्कल वापरुनच मतदान केलं आणि अक्कल असणाऱ्यांनाच सत्ता दिली. तर अक्कल नसलेल्यांचा पराभव झाला", असाही खोचक वार नारायण राणे यांनी अजित पवारांचं नाव न घेता केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात आले होते. यावेळी त्यांनी बँक आणि संस्था चालवण्यासाठी, टिकवण्यासाठी अक्कल लागते, असं विधान केलं होतं. याच विधानाचा राणेंनी आज निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत समाचार घेतला.
अमित शहांना सर्व रिपोर्ट देणार
गेल्या चार दिवसांत कोकणात काय काय झालं. कसा सत्तेचा, कायद्याचा आणि पोलिसांचा गैरवापर केला गेला याची इत्यंभूत माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देणार असल्याचंही नारायण राणे यावेळी म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून जो काही प्रकार सुरू होता त्यातून महाविकास आघाडी सरकार किती अस्वस्थ आहे हेच दिसून येत होतं. अखेर आज त्यांना त्यांची जागा कळाली आहे, असंही राणे म्हणाले.
राज्याला भाजपाचा मुख्यमंत्री हवा
आता आमचं टार्गेट महाराष्ट्र सरकार, असं म्हणत नारायण राणे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, असं विधान केलं. सध्याचा कोरोना काळ, खुंटलेली आर्थिक प्रगती यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी चांगला मुख्यमंत्री आणि चांगलं सरकार गरजेचं आहे. आम्हाला आता भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, यांच्यासारखी 'लगान' टीम नको, असा टोला नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला.