महेश सरनाईकसिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्गलोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून देशातील चारही सभागृहांमध्ये निवडून येण्याचा मान मिळविला आहे. यापूर्वी असा मान राज्यातील पाच माजी मुख्यमंत्र्यांनी मिळविला होता. यात राणे आता सहाव्या क्रमांकावर आले आहेत.माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते तथा लोकसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत मनोहर जोशी आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी अशा प्रकारे चारही सभागृहात जाण्याचा मान मिळविला होता. आता यात राणेंची भर पडली आहे.राणे यांनी १९९० पासून २०१४ पर्यंत सलग सहा वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या.त्यामुळे ते तब्बल २४ वर्षे विधानसभा सदस्य होते. त्यानंतर २०१७ साली त्यांनी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणूक लढवून ते विधान परिषदेच्या सभागृहात काही काळ आमदार होते. २०२१ साली भाजपा प्रवेशानंतर त्यांना राज्यसभेवर खासदार करण्यात आले, तर तत्कालिन मोदी सरकारमध्ये ते सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री होते.राणे २००५मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यावर ते काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांचा आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून समावेश झाला. राणे यांचा २०१४ विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून पहिला पराभव झाला. २०१७मध्ये राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. हा पक्ष त्यांनी १५ ऑक्टोबर २०१९मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये विलीन केला.
महाराष्ट्राचे अल्प कालावधीसाठी मुख्यमंत्रीराणे यांनी विसाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला. चेंबूर येथे स्थानिक शाखाप्रमुख म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ते महापालिकेमध्ये नगरसेवक झाले. सन १९९० मध्ये तत्कालिन कणकवली - मालवण मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. भाजप - शिवसेना युती सरकारच्या काळात राणेंना प्रथम महसूल मंत्रालय मिळाले. १९९९मध्ये फेब्रुवारी ते ऑक्टोबर असे ९ महिने ते राज्याचे मुख्यमंत्री होते. ठाकरे आणि राणे यांच्यातील संबंध बिघडल्यानंतर २००५मध्ये ते पक्षाबाहेर पडले होते.
मूर्ती लहान पण कीर्ती महानमूर्ती लहान पण कीर्ती महान असे वर्णन नारायण राणे यांचे करता येईल. राजकारणात त्यांनी सक्षम नेतृत्व केले. ते माध्यमात कायम चर्चेत असतात. त्यांची कारकीर्द एक शिवसैनिक म्हणून सुरू झाली. नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. या काळात त्यांनी शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष, भाजप असा पक्षबदलही केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. राणे यांनी ७२व्या वर्षांत प्रवेश केला असला तरी त्यांचा उत्साह दांडगा आहे.सर्व सहाही राज्याचे माजी मुख्यमंत्रीशंकरराव चव्हाण, शरद पवार, मनोहर जोशी, पृथ्वराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि नारायण राणे हे सर्व सहाही जण राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. यातील अशोक चव्हाणवगळता अन्य पाच जण देशात केंद्रीय मंत्री म्हणूनही कार्यरत होते.