सिंधुदुर्ग - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. शिवसेनेत उभी फूट पडून ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद गेल्यापासून ठाकरेंचे कट्टर वैरी असलेल्या नारायण राणे आणि त्यांच्या मुलांकडून शिवसेनेवर बोचरी टीका करण्यात येत आहे. शिवसेना संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असून, मुख्यमंत्री असताना त्याना सरकार वाचवता आले नाही.यांच्या सारखे दुर्देव ते काय आता शिवसेना कदापी उभी राहणार नाही, अशी टीका नारायण राणेंनी केली होती. त्याला आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे हे मोदी सरकारमधील सर्वात निष्क्रिय केंद्रीय मंत्री आहेत. लवकरच त्यांचं मंत्रिपद जाईल, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.
विनायक राऊत म्हणाले की, नारायण राणेंच्या दुकानाचं शटर पूर्ण बंद झालेलं आहे, त्याचं त्यांनी अवलोकन करावं. कालपरवापर्यंत माझा मुलगा पालकमंत्री होईल, अशा मिटक्या राणे मारत होते. मात्र आता दीपक केसरकरांच्या रूपात नितेश राणेंना त्यांची जागा दाखवली जाईल. तसेच भाजपासुद्धा नारायण राणेंचं मंत्रिपद काही महिन्यात काढून घेईल. या देशातील सर्वात निष्क्रिय केंद्रीय मंत्री म्हणून नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नारायण राणेंची नोंद झाली आहे, असं मला कळलं आहे. त्यामुळे राणेंनी शिवसेनेला शहाणपणा शिकवू नये, स्वत:चं दुकान चालू राहतंय की बंद होतंय याचा त्यांनी विचार करावा, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनेवर ही वेळ आली आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना विनायक राऊत म्हणाले की, नारायण राणेंना शिवसेनेवर बोलायला तोंड आहे का? गद्दारी, बेईमानी, कृतघ्नपणा ज्यांच्या माध्यमातून निर्माण झाला त्या नारायण राणेंनी शिवसेनेची काळजी करण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांचं उर्वरित राजकीय आयुष्य दोन अहीमही रावणांना घेऊन कसं वाचेल याची चिंता त्यांनी करावी, असा टोलाही राऊत यांनी नारायण राणेंना लगावला.
शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह पक्षाकडेच राहील, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने सर्व निकषांची पूर्तता केल्यावर दिलेलं आहे. त्या अशा बाटग्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही. निवडणूक आयोगाने तशी विचारणा केली तर त्याची संपूर्ण कायदेशीर पूर्तता करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे, असे विनायक राऊत यांनी सांगितले.