सिंधुदुर्ग: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे? हेच समजत नाहीत. संजय राऊत जसे दाखवतात तसे नाहीत. लावालावीचे काम करतात त्यामुळेच त्यांचे नाव संजय राऊत आहे, अशी खोचक टीकाही नारायण राणे यांनी केली.
देशात सत्ता असताना भाजपने ऐक्य कधीच तोडले नाही. ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का, अशी विचारणा करत सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती, या शब्दांत नारायण राणे यांनी टीका केली आहे. सिंधुदुर्ग येथे एका सभेला संबोधित करताना नारायण राणे बोलत होते.
भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे काम सुरू
संसदेत बोलताना अडखळल्याप्रकरणी नारायण राणे यांना ट्रोल करण्यात आले होते. यावर बोलताना ते म्हणाले की, मला प्रश्न समजला होता. अध्यक्षांना वाटले, तो प्रश्न समजला नसेल, म्हणून त्यांनी तो पुन्हा सांगितला. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. परंतु, मी पूर्ण तयारीने गेलो होतो. कोणतेही कागदपत्रे हातात न घेता उद्योगासंदर्भात माहिती दिली. भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे काम सुरू आहे. अधिवेशनामध्ये कायदे करणारी बिल पास होत आहेत. सर्व काही व्यवस्थित सुरु आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले. तीन पक्षांना निवडूक नको. आजच मरण उद्यावर ढकलण्याचे काम सुरु आहे. मुंबई मनपामध्ये दिसेल असे काम करू. मला ५५ वर्ष राजकारणात झाली, त्यामुळे मुंबई मनपामध्ये सत्ता बदल होईल, असे नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, आपल्या देशामध्ये जे विकृत राजकाराण सुरू आहे, त्यावरसुद्धा शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढले आहे. भाजपला देशाचे ऐक्य नको आहे, हे त्यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले आणि आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले. ते तेव्हापासून सांगत आहेत की, भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे, हे शरद पवारांनी १९९६ साली सांगितले आणि आम्हाला आता ते कळायला लागले आहे, असे संजय राऊत म्हणाले होते.