सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपानं वर्चस्व सिद्ध करत महाविकास आघाडीला धुळ चारल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कायद्याचा, पोलिसांचा गैरवापर करुन महाविकास आघाडी सरकारनं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमचा पराभव करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ज्यांना अक्कल आहे अशा लोकांनाच सत्ता मिळाली आणि अक्कल नसलेल्यांचा पराभव झाला, असा खोचक वार करत नारायण राणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून जो काही प्रकार सुरू होता त्यातून महाविकास आघाडी सरकार किती अस्वस्थ आहे हेच दिसून येत होतं. अखेर आज त्यांना त्यांची जागा कळाली आहे, असंही नारायण राणे म्हणाले.
आम्हाला भाजपाचा मुख्यमंत्री हवाआता आमचं टार्गेट महाराष्ट्र सरकार, असं म्हणत नारायण राणे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, असं विधान केलं. सध्याचा कोरोना काळ, खुंटलेली आर्थिक प्रगती यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी चांगला मुख्यमंत्री आणि चांगलं सरकार गरजेचं आहे. आम्हाला आता भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, यांच्यासारखी 'लगान' टीम नको, असा टोला नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला.
पोस्टरबाजीवरही साधला निशाणानितेश राणे हरवले आहेत अशी पोस्टरबाजी मुंबईत सुरू असल्याचं राणे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. "शिवसेनेचे लोक फक्त पोस्टर लावायच्याच लायकीचे आहेत. आता त्यांनी एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन राज्यभर पोस्टर लावत फिरावेत. आम्ही जनतेच्या विकासाचं राजकारण करू", असं राणे म्हणाले.
सगळ्यांना पुरून उरलोय"नारायण राणेला संपवण्याची भाषा करणाऱ्यांना सणसणीत उत्तर मिळालं आहे. तीन पक्ष एकत्र येऊन लढले तरी भाजपाची सत्ता आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आली आहे. इथल्या जनतेनं भुरट्यांच्या हातात सत्ता जाऊ दिली नाही. नारायण राणे एवढ्या वर्षात सगळ्यांना पुरुन उरलाय आणि केंद्रात पोहोचलाय. मध्येच कुठे थांबलेला नाही", असंही नारायण राणे म्हणाले.