कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्रीनारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे. हा केवळ सिंधुदुर्गचाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचा सन्मान आहे,असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी व्यक्त केले.दिल्ली येथे बुधवारी अतुल काळसेकर व सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील राजकारण तसेच विविध विकासकामे व प्रकल्पांबाबत चर्चा झाली.त्याविषयी अतुल काळसेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.त्यांनी म्हटले आहे की, आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातुन चांगल्या प्रकारे देशाला, पर्यायाने उपक्रमशील उद्योजकांना नारायण राणे न्याय देऊ शकतील. त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग प्रणालीत जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय,फळप्रक्रिया व्यवसाय,पर्यटन व्यवसाय, खादी ग्रामोद्योग व इतर लघु उद्योगाना आणि त्या अनुषंगाने व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नव उद्योजकांना त्यांच्याकडे असलेल्या खात्याच्या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध होतील.
केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर अभियानाला यामुळे खऱ्या अर्थाने गती प्राप्त होईल. नारायण राणे यांना मिळालेले केंद्रीय मंत्रीपद ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुसंधी आहे.