कणकवली : नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नरडवे भैरवगाव, यवतेश्वर, जांभळगाव, पिंपळगाव, दुर्गानगर या गावांमधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. विविध मागण्या सरकार दरबारी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नरडवे धरण प्रकल्पाचे सुरू असलेले काम ९ डिसेंबरला बंद पाडणार असल्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांच्यावतीने नरडवे धरणग्रस्त समन्वय समितीच्यावतीने प्रशासनास देण्यात आला आहे.कामबंद आंदोलनाबाबत कणकवली पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. आंदोलनासंदर्भात मुंबई येथे २४ नोव्हेंबर रोजी धरणग्रस्तांची बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या न सुटल्याने शासनाविरोधात तीव्र असंतोष असल्याचे स्पष्ट झाले.
नरडवे धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त नोकरीधंद्यानिमित्त गावाबाहेर असल्याने मागण्यांकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे गावातील प्रकल्पग्रस्त व बाहेरील यांची एकत्रित बैठक घेऊन ९ डिसेंबर रोजी कामबंद आंदोलन छेडण्यात येणार आहे.त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात प्रकल्पग्रस्तांनी म्हटले आहे.