खाकीतील नारी शक्तीनं केलं उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य; पवारांसह गृहराज्यमंत्र्याकडून तृप्ती मुळीक यांचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 05:48 PM2021-12-26T17:48:05+5:302021-12-26T17:52:29+5:30
मुळीक या सिंधुदुर्ग मोटार परिवहन विभागात कार्यरत असून अलिकडेच त्यांनी व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत.
अनंत जाधव -
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य खाकीतील नारी शक्तीने केल्याने सिंधुदुर्ग पोलिसाची मान अभिमानाने उंचावली आहे. रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल तीन मंत्री आले होते त्या सर्वानी एकाच गाडीतून प्रवास केला. या गाडीचे सारथ्य महिला पोलीस कॉस्टेबल तृप्ती मुळीक यांनी केले. त्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप पाडळी गावच्या रहिवासी असून सध्या त्या मोटर परिवहन विभागात कार्यरत आहेत.
एखाद्या जिल्ह्यात व्हीआयपी मुमेंट म्हटले की पोलीसांना डोळ्यात तेल घालून त्याची सुरक्षा करावी लागते. यातच महत्वाचे मंत्री आले तर त्याच्या गाडीपासून ते ज्या रस्त्यावरून ते जाणार त्या रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्थाही पोलिसांना बघावी लागत असते. मात्र रविवारी सिंधुदुर्ग पोलीसांनी प्रथमच एक अभिनव उपक्रम राबवला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या गाडीचे सारथ्य चक्क एका महिला पोलीसांच्या हाती दिले होते.
यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटीलही उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या सोबत होते. चिपी विमानतळावरून ओरोस आणि नंतर पुन्हा चिपी विमानतळ, असा हा प्रवास होता. यानंतर, उपमुख्यमंत्री पवार यांनी या महिला पोलीसाचे कौतुकही केले. याच बरोबर राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिला पोलीसांकडून केले जाणे, ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलीस दलातील महिला चालकाने केले.#AjitPawar#sindhudurgapic.twitter.com/koGPBHznox
— Lokmat (@lokmat) December 26, 2021
मुळीक या सिंधुदुर्ग मोटार परिवहन विभागात कार्यरत असून अलिकडेच त्यांनी व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत. पण, लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने 23 डिसेंबर, 2021 रोजी त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर, आजचा दिवस हा त्यांच्या या नव्या जबाबदारीचा पहिलाच दिवस होता. त्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.
मुळीक यांचे ड्रायव्हिंग कौशल्य वाख्याण्याजोगे असून राज्यातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे. या प्रसंगामुळे माझ्या मनात माझ्या पोलीस विभागाबद्दलचा अभिमान अधिकच वाढला, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यानी सांगितले.