तळेरे , दि. १८ : साळीस्ते कांजीरवाडी येथील श्री रामेश्वर ग्रामविकास मंडळामार्फत नरक चतुर्दशीनिमित्ताने भव्य दिव्य नरकासूर दहन करण्यात आला होता. या मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
नरक चतुर्दशी दिवशी पहाटे विविध ठिकाणी नरकासूर दहन केला जातो. ईडा पिडा दूर जाऊन दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यांचे प्रतीक म्हणून नरकासूर दहन केला जातो. साळीस्ते येथील श्री रामेश्वर ग्रामविकास मंडळामार्फत यावर्षी सुमारे १२ फूट उंच नरकासूर तयार करण्यात आला.
या नरकासूराचे दहन मंगळवारी मध्यरात्री करण्यात आले. हा नरकासूर तयार करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. मंगळवारी रात्री १२ वाजल्यानंतर या नरकासूराचे दहन करून ईडा पिडा टळून बळीचे राज्य येवो, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या मंडळामार्फत दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. यासाठी साळीस्ते कांजीरवाडी व मुंबई मंडळांचे पदाधिकारी विशेष मेहनत घेतात.