कणकवली :आमच्यावर दहशतवादाचा आरोप करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सभांना गुंडांची उपस्थिती होती.शिवसेनेला माणसेच मिळत नसल्याने गुंड घेऊन फिरण्याची वेळ आली आहे.आम्ही मात्र विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली.त्यामुळे जनता आमच्या पूर्ण पाठीशी राहिल.नीलेश राणे ६० हजाराच्या मताधिक्याने निवडणून येतील असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे व्यक्त केला.नारायण राणे यानी कणकवली तालुक्यातील वरवडे फणसनगर येथे मंगळवारी ११.३० वाजण्याच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला.यावेळी त्यांच्या समवेत पत्नी निलम राणे, सून प्रियांका राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.मतदानाचा हक्क बजावण्यापुर्वी नारायण राणे यानी वरवडे येथील आपल्या निवासस्थानी भेट देऊन देवदर्शन घेतले त्यानंतर फणसनगर जिल्हापरिषद शाळेतील मतदान केंद्रावर दाखल होत मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.नारायण राणे म्हणाले, गेली ३० वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.जिल्ह्याचा विकास करत असताना जात,पात,धर्म न मानता जिल्हा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवुन काम केले.त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मतदार निश्चितपणे निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.दहशतवादाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, दहशतवाद जिल्ह्यात कोण करतो हे कालच्या प्रसंगावरुन सिध्द झाले आहे.पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या समवेत सभेत निलेश पराडकर नामक गुंड बसतो. त्यावरुन शिवसेना हीच दहशत पसरवित असल्याचे सिध्द होत आहे.
जिल्ह्याच्या विकासाची कोणती कामे करायची नाहीत आणि समोरच्यांना बदनाम करायचे हेच शिवसेनेचे सुत्र असुन शिवसेनेत नितिमत्ता आणि धोरण शिल्लक राहीलेले नाही.उध्दव ठाकरे यांना विकासाबाबत काही देणे-घेणे राहीलेले नाही. केवळ मतांसाठी नागरिकांचा वापर करायचा हेच त्यांचे सुत्र असुन सिंधुदुर्गात दहशतवाद पसरविण्यास शिवसेनाच कारणीभुत असल्याचा आरोप खासदार नारायण राणे यानी यावेळी केला.