सिंधुदुर्ग : नाटळ - कनेडी पुलाच्या कामासाठी सहा कोटी निधीला मंजुरी मिळणार आहे. पुढच्या पावसाळ्यापूर्वी पूल सुरु केला जाईल. दरम्यानच्या कालावधीत पर्यायी पुलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी आज चिपळूण येथून थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवरून चर्चा केली.जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची काल केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठका घेतल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सामंत आणि खासदार राऊत यांनी आज चिपळूण येथे पूरग्रस्त भागातील प्राधान्याने करावयाच्या कामांबाबत सविस्तर चर्चा केली. यामध्ये विशेषतः खारेपाटण येथील पर्यायी मार्गासाठी 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
खारेपाटण येथील खाडीला पत्तन विभागाच्या माध्यमातून संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. या भिंतीची उंची वाढवण्यासाठी जिल्हा नियोजनमधून 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता म.श्री. कदम यांनी नरडवे - पामतेल येथील के.टी. वेअरची पाहणी केली असून या के.टी.वेअरला संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.तिलारी कॅनॉल दुरुस्तीसाठी 35 कोटी; निविदा प्रक्रिया राबवाजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तिलारी येथील कॅनॉल दुरुस्तीसाठी 35 कोटीचा निधी मंजूर केला आहे. याबाबत लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून हे काम पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री श्री सामंत यांनी अधिक्षक अभियंत्यांना दिली. तिलारी प्रकल्प हा सद्यःस्थितीत अंतिम टप्प्यात असून प्रकल्पाचे कालवे पूर्ण होऊन सुमारे 30 - 35 वर्षे कालावधी झाला आहे.
हे कालवे प्रामुख्याने मऊस्तर मातीमधून गेल्यामुळे सन 2019 - 20 च्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये क्षतीग्रस्त झाले होते. ज्या ठिकाणी डोंगर कडा ढासळून कालव्यातील प्रवाह बंद होतो, त्या ठिकाणी क्षेत्रीय परिस्थितीनुसार मंजुषा पेटीचे बांधकाम करणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, तसेच कालवा गळतीच्या ठिकाणी कालवा अस्तरीकरण करणे अशा प्रतिबंधक उपाययोजनेच्या नवीन व दुरुस्तीच्या कामांसाठी सुमारे 35 कोटी च्या रकमेची मागणी शासनस्तरावर करून पाठपुरावा करण्यात आला होता.
खासदार राऊत हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिपळूण येथे स्वतः थांबून यंत्रणा राबवित आहेत. पूरग्रस्त भागात करावयाच्या कामांबाबत प्राधान्य देण्यासाठी आज त्यांच्यासोबत चर्चा झाली. पुढील दौऱ्यात बांदा, तिलारी येथील पाहणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चिपी विमानतळाच्या अनुषंगानेही बैठक घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.