कणकवली : तालुक्यातील वागदे-गावडेवाडी येथील सीमा दिलीप गावडे हिला राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे केलेल्या सामाजिक कार्याबद्दल इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार देऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गुरुवारी गौरविण्यात आले. कोल्हापूर येथून शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेमधून तिने विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. प्रमाणपत्र, ५० हजार रुपये आणि रौप्यपदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सीमा गावडे हिने शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर येथून कला शाखेतून पदवी घेताना राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेतला होता. पदवी शिक्षणाच्या तीनही वर्षात तिने एनएसएसच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, नेत्रदान शिबिरे, एचआयव्ही जनजागृती, स्त्री-भ्रूणहत्या जनजागृती अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. एनएसएसमधून समाजासाठी चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. भारतभरातील जवळपास चार लाख स्वयंसेवकांमधून ३० स्वयंसेवक या पुरस्कारासाठी निवडले जातात. यात राज्यातूून पहिला क्रमांक पटकावत सीमाने पुरस्कारावर नाव कोरले. नवी दिल्लीच्या राजभवनातील शाही सोहळ्य्ाात सीमा गावडे हिला पुरस्कार देऊन गौरविले. २०१४-१५ या वर्षासाठीचा हा पुरस्कार आहे. सीमाचे वडील दिलीप गावडे शेती व इतर कामे करतात. आई, बहीण, काका व त्यांचे कुटुंबीय असा तिचा परिवार आहे. पदवी शिक्षणानंतर सीमा पुणे येथे पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे. वागदे गावातर्फे सीमा हिचा सत्कार केला जाणार असल्याचे सरपंच संदीप सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वागदेच्या तरुणीचा राष्ट्रीय सन्मान
By admin | Published: November 21, 2015 10:58 PM