राजापूर : राजापूरचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांचा शिक्का घेऊन त्यांच्या नावाने बनावट सह्या मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राजापुरात उघड झाला आहे. शहरातील महा-ई-सेवा केंद्र-३ मधून राष्ट्रीयत्वाचे दाखले अशा प्रकारे दिल्याचे उघड झाल्याने राजापूर प्रांत कार्यालयासहीत सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गुरुवारी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी निवासी नायब तहसीलदार राजेंद्र बिर्जे यांना दिले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.जैतापूर येथील विनायक भैरवनाथ माडगुळकर व विशाल भैरवनाथ माडगुळकर यांनी राष्ट्रीयत्वाचा दाखला मिळावा म्हणून राजापूर तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या महा-ई-सेवा केंद्र क्र.३ मध्ये अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना हे दोन्ही दाखले दि. ५ फेब्रुवारी रोजी या महा-ई-सेवा केंद्रातून देण्यात आले. मात्र, या दाखल्यांवर माडगुळकर या आडनावात चुकीची नोंद झाली होती. त्यामुळे त्यांनी हे दाखले त्वरित दुरुस्तीसाठी महा-ई-सेवा केंद्रात परत केले. त्यानंतर दि. ११ फेब्रुवारीला महा-ई-सेवा केंद्राच्या ठेकेदारांनी हे दाखले दुरुस्तीसाठी प्रांत कार्यालयात नेले असता तेथे हे दाखले या कार्यालयातून वितरित झाले नसल्याचे कार्यकारी पदावर काम करणाऱ्या हरिदास देवळेकर यांच्या निदर्शनास आले. तसेच असणाऱ्या प्रांतांच्या सह्या खोट्या असून, दाखल्यावर मारण्यात आलेले गोल शिक्के सहा महिन्यांपूर्वी हरविले असल्याचे निदर्शनास आले.सहा महिन्यांपूर्वी प्रांताचा शिक्का चोरीला जाऊनदेखील त्याबाबत हलगर्जीपणा दाखवल्याचा देवळेकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. महा-ई-सेवा केंद्र क्र. ३ व तेथे काम करणारा एक कर्मचारी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेशही प्रांताधिकाऱ्यांनी दिले आहेत. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)
प्रांताधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांनी राष्ट्रीयत्वाचे दाखले
By admin | Published: February 13, 2015 1:02 AM